Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दर आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असताना लाचखोरी थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलुचपत विभागाचे अधिकारी कर्मचारी कसोशीने लाचखोरीला आळा बसावा यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु लाचखोरी थांबायचं नाव घेत नाही. अशातच निफाड तालुक्यात पुन्हा लाचखोरीचे (Bribe) प्रकरण समोर आले आहे. 


निफाड (Niphad) येथील येवला रोडवरील बार चालकाकडून 9 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह दोन खासगी व्यक्ती, अशा तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या पथकाने सदरील कारवाई केली असून, निफाड पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश संजय गायकवाड या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह बारचालकांकडून वसुलीसाठी मध्यस्थी असलेले पंडित रामभाऊ शिंदे, प्रवीण साहेबराव ठोंबरे असे तिघा लाचखोरांची नावे आहेत. 


दरम्यान निफाड शहरातील हॉटेल व्यवसायिक असलेल्या तक्रारदाराचे येवला रोडवर तीन बार ॲण्ड रेस्टॉरंट आहेत. बार ॲण्ड रेस्टॉरंटची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून केली जात असते. या नियमित तपासणीमध्ये हॉटेल्समधील कामाच्या त्रुटी न काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील जवान लोकेश गायकवाड तसेच वसुलीसाठी मध्यस्थी असलेले दोघे खासगी व्यक्ती संशयित शिंदेआणि  ठोंबरे यांनी एका हॉटेलचे चार हजार रुपये प्रमाणे 12 हजार गेल्या 3 फेब्रुवारी रोजी मागणी केली होती. तडजोडीअंती तीन हॉटेलचे मिळून 9 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने निफाड येथे सापळा रचत लाचेची रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहाथ अटक केली.


नाशिकसह जिल्ह्यातील मागील काही लाचखोरीच्या घटनांचा आढावा घेतला असता निफाड तालुक्यात काही दिवसांपूर्वी एक नायब तहसीलदार आणि कोतवाल, ग्रामसेवकाला लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले होते. त्यांनतर आता थेट राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीचे जाळे शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पसरल्याचे अधोरेखित झाले आहे. निफाडच्या एका गावातील तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या कोतवालाला तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.


एसीबीकडून आवाहन....


दरम्यान या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलिस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एसीबीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.