Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) लाच लुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) केलेल्या एका मोठी कारवाईने खळबळ उडाली आहे. जलसंधारण विभागातील एका अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. ऋषिकेश देशमुख (उपविभागीय अधिकारी वैजापूर जलसंधारण विभाग) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे. तर लाच लुचपत विभागाने ऋषिकेश देशमुख यांना ताब्यात घेतले असून,त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. मात्र तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. दरम्यान एसीबीने लावलेल्या ट्रॅपनुसार, देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. ऋषिकेश देशमुख यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
काय आहे प्रकरण!
तक्रारदार यांच्या चौडेश्वरी कंट्रक्शन परभणी या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधा-याचे गवळी पिंपळी ता. सोनपेठ जि. परभणी येथील कामाचे देयक 18 लाख आणि गोविंदपुर ता.पूर्णा जि. परभणी येथील कामाचे देयक 1 कोटी 19 लाख असे मिळुन दोन्ही कामाचे देयक एक कोटी 37 लाख रुपये देयक बाकी होते. हे सर्व देयक काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे साहेब यांच्यासाठी 7.5 टक्के प्रमाणे म्हणजेच 8 लाख 3 हजार 250 आणि स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून 50 हजार असे एकूण 8 लाख 53 हजार 250 रुपयाची मागणी देशमुख यांनी केली होती. दरम्यान आज महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरगाबाद कार्यालयासमोर देशमुख आणि जलसंधारण महामंडळ कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या भाउसाहेब दादाराव गोरे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
भूमि अभिलेख अधिकारीही अडकला जाळ्यात!
दरम्यान दुसऱ्या एका कारवाईत गंगापूर येथील भूमि अभिलेख विभागातील उप अधीक्षकाला लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर येथील भूमि अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक साळोबा लक्ष्मण वेताळ (वय 51 वर्ष) कार्यरत आहे. दरम्यान तक्रारदार यांची शेती मोजणी करण्यासाठी त्यांनी गंगापूर येथील भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मात्र जमीन मोजण्यासाठी साळोबा वेताळ यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी तडजोडी अंती 35 हजार रुपये देण्याचं ठरलं. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर पंचा समक्ष 30 हजार रुपये घेताना साळोबा लक्ष्मण वेताळ यांना रंगेहात पकडले आहे. तर वेताळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad Abortion Case: औरंगाबाद गर्भपात प्रकरणातील धक्कादायक माहिती; मोठं रॅकेट असण्याची शक्यता