Nashik News : दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील (Nashik) मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील हरवलेला मुलगा सिटीलिंक कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे त्याच्या आईवडिलांकडे सुखरूपपणे परत करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एकदा सिटीलिंक कर्मचार्यांच्या सतर्कता व जागरूकतेमुळे दोन हरविलेली मुले आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.
सोमवारी सिन्नर (Sinnar) तालुक्यातील माळेगाव फाटा येथील रहिवासी असलेली दोन मुले घरून पळून गेली होती. ही दोन मुले सख्खे भाऊ असून हे दोघे रात्री 8 वाजेच्या सुमारास सिटीलिंक बसमध्ये बसलेली होती. परंतु बसमधील चालक व वाहक यांना या दोन्ही मुलांबाबत संशय आल्याने त्यांनी या दोन्ही मुलांना घेऊन निमाणी बसस्थानक (Nashik Citylink Bus) येथील वाहतूक नियंत्रक प्रवीण कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले. ही दोन्ही मुले शालेय गणवेशात असल्याने त्यानुसार चौकशी करून शाळेशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर आई वडिलांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा मुलांचे आई वडील निमाणी बसस्थानक (Nimani Bus stand) येथे दाखल झाले असता सदर दोन्ही मुले सुखरूपरित्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.
या घटनेनंतर आई वडिलांनी आनंद व्यक्त करतांनाच सिटीलिंक कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले. तसेच एकाच आठवड्यात हरवलेल्या तीन मुलांना सिटीलिंक कर्मचार्यांच्या सतर्कता व जागरुकतेमुळे आईवडिलांकडे परत पाठविण्यात आल्याने सिटीलिंक कर्मचार्यांच्या कामाचे देखील कौतुक करण्यात येत आहे. नाशिक शहराची प्रवास वाहिनी असलेल्या सिटीलिंक मधील कर्मचारी प्रवाशांना सुखकर व सुरक्षित प्रवास देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. नुकतेच आपली कामगिरी बजावत असतांना सिटीलिंक कर्मचार्यांची सतर्कता व जागरुकता देखील दिसून आली. सिटीलिंक कर्मचार्यांच्या जागरुकतेमुळे हरवलेला शालेय मुलगा सापडला असून सदर मुलाला सुखरूपरित्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले.
नाशिक शहरालगत असणार्या मखमलाबाद गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी घरात झालेल्या छोट्याशा वादामुळे शाळेत न जाता शाळेच्या गणवेशात नाशिकमध्ये भरकटत होता. त्याचवेळी सदर मुलगा निमाणी बसस्थानक येथे आढळून आल्यानंतर निमाणी बस स्थानकाचे जागरूक कंट्रोलर चंद्रकांत आव्हाड यांना संशय आल्याने आव्हाड यांनी सदर मुलाला कंट्रोल रुम मध्ये बसविले व त्याची विचारपूस केली. तर सदरमुलगा शालेय गणवेशात असल्याने त्याचे वह्या पुस्तके बघून त्यावरील शाळेचे नाव लक्षात आले. त्यानुसार शाळेशी संपर्क साधून मुलाच्या आईवडिलांचा शोध घेण्यात आला. अखेर सदर मुलाचे आईवडिल निमाणी बस स्थानक याठिकाणी आले असता मुलाला सुखरूपरित्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.