Nashik Saptshrungi Devi : पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सजावट केलेल्या एक टन द्राक्षांची चोरीची (Grapes Theft) घटना ताजी असतानाच नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात (Saptshrungi Devi Mandir) चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे मंदिर परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या चोरट्यांनी सीसीटीव्हीला (CCTV) चुना फासत ही चोरी केली आहे. विशेष म्हणजे घटनेला वीस दिवस उलटूनही अद्याप याबाबत गुन्हाच दाखल नसल्याचे समोर आले आहे. 


नाशिकचे (Nashik) सप्तशृंगी मंदिर हे महाराष्ट्रच नवे देशभरात सर्वश्रुत आहे. त्यामुळे देशभरातून लाखो भाविक भक्त रोजच दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक कोणी वस्तू स्वरुपात, कोणी रोख रक्कम स्वरुपात, कोणी दागिन्याच्या स्वरुपात देणगी देत असते. दरम्यान मंदिर परिसरात विविध ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. यातील एका दानपेटीवर (Donation Box) अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरा असताना देखील चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


महत्त्वाचे म्हणजे सप्तशृंगी मंदिरातील (saptshrungi Gad) दानपेटीत ही चोरी 13 फेब्रुवारी रोजीची घटना आहे. मात्र वीस दिवस उलटूनही याबाबत कोणालाही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय चोरीबाबत अद्याप गुन्हा देखील दाखल नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल नसून विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पत्र दिले आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरातील दानपेटी असलेल्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासत ही चोरी केली आहे. या चोरीत किती रक्कम चोरट्यांनी पळवली आहे? किंवा अन्य काही चोरुन नेले आहे का? याबाबत अद्याप माहिती नाही. या चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरच सत्य काय ते समोर येईल. मात्र दुसरीकडे देवीच्या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला टाकल्याने खळबळ उडाली आहे.


सीसीटीव्हीसारखा कडा पहारा.... 


चोरट्याने दानपेटीवर डल्ला मारतानाच दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. मंदिर परिसरात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्हीसारखा कडा पहारा असताना या चोरीमुळे एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंदिराची पहिली पायरी, गणपती मंदिर, रामटप्पा तसेच ज्या ठिकाणी दानपेटी ठेवल्या आहेत तेथे सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या चोरट्याने दानपेटीवर डल्ला मारताना आपल्याला कोणी पकडू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरावर चक्क पांढऱ्या रंगाचा चुना फासल्याचे निदर्शनास आले आहे.


विश्वस्त दीपक पाटोदकर म्हणाले...


या चोरी प्रकरणी विश्वस्त दीपक पाटोदकर म्हणाले की सप्तशृंगी देवी मंदिराच्या परिसरात दानपेटीतून पैसे चोरीचा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पगार देऊन सुरक्षा महामंडळाकडून घेतलेल्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली मंदिर परिसर असताना दान पेट्यांमध्ये अफरातफर होणे. तसेच काही नोटा जळालेल्या अवस्थेत आढळून येणे. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्याबाबत चौकशी करुन गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.