Nashik News : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अनेक भागातील सरकारी कार्यालये जणू लाचखोरीची केंद्रे बनत चालली आहेत. दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता मनमाड शहरातील (Manmad) नगरपरिषदेतील तीन कर्मचाऱ्यांना 36 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 


नाशिकसह विभागात लाचखोरीच्या (Bribe) घटनांना ऊत आला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये सध्या भ्रष्टाचाराची कीड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे सातत्याने लाचखोरीच्या घटनांनी अधोरेखित होत आहे. नाशिकमध्ये तर टक्केवारीला उधाण आले आहे. दर एक दिवसाआड लाचखोरीचं एक प्रकरण समोर येत आहे. मनमाड नगरपालिकेतील लेखा विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक पथकाच्या (ACB) कारवाईत 36 हजारांची लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतलं आहे. वरिष्ठ लिपिक आनंद प्रभाकर औटी, रोखपाल संजय बबन आरोटे आणि शिपाई नंदू पंडित मस्के हे तिघेही मनमाड नगर परिषदेत (Manmad Nagar Parishad) कर्मचारी आहेत. या तिघांना लाच घेताना एसीबीने कारवाई केली आहे. 


36 हजार रुपयांच्या लाचेची मागणी


लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे काम करत असलेल्या कन्स्ट्रक्शन फर्मचे बिल नगरपरिषद कार्यालय मनमाड येथे जमा करण्यात आलेले होते. संबंधित कामाच्या बिलाचा चेक तयार करुन चेक काढून देण्याच्या मोबदल्यात यातील वरिष्ठ लिपिक औटी आणि शिपाई नंदू मस्के यांनी टक्केवारीनुसार 36 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान ही बाब तक्रारदाराने एसीबीकडे सांगितली. एसीबीने सापळा रचून रंगेहाथ अटक करण्याचे ठरवले. त्यानुसार 3 मार्च रोजी 36 हजार रुपये लाचेची रक्कम रोखपाल आणि शिपायाने तक्रारदाराकडून स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्यासह पोलीस कर्मचारी किरण अहिरराव, अजय गरुड, परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


एक दिवसाआड एक लाचखोर अटकेत


सरकारी कार्यालयांमध्ये सध्या भ्रष्टाचाराची किड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे दाखवणारी एक आकडेवारी नाशिक विभागात समोर आली आहे. 2023 सालच्या गेल्या 57 दिवसात तब्बल 28 लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकरण सातत्याने समोर येत आहेत. दर एक दिवसाआड एक लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने लाचखोरी किती खोलवर पसरलेली आहे, हे दिसून येते. एसीबीच्या वतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक यांनी केले आहे.