Nashik Graduate Constituency : नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत नवनवे ट्विस्ट समोर येत असून अद्याप दोन उमेदवारांमध्ये जोरदार टशन पाहायला मिळणार अशी शक्यता होती. मात्र रोज नव्या अपक्ष उमेदवारांना संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. अशातच संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने नाशिक पदवीधर निवडणुकीत उडी घेतली आहे. अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांच्या पाठिशी संघटना उभी राहणार असल्याचे करण गायकर यांनी स्पष्ट केले आहे. 


नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार सुरेश पवार (Suresh Pawar) यांना मदत करणार असल्याची घोषणा स्वराज्य संघटनेचे (Swarajya Sanghatana) करण गायकर यांनी केली आहे. स्वराज्य संघटनेने नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) उडी घेतली असून स्वराज्य संघटनेकडून अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सुरेश पवार यांनी काल (20 जानेवारी) संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वराज्य संघटनेत प्रवेश केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी पवार यांना शुभेच्छा देत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत अशी भूमिका मांडली. त्यानंतर आज (21 जानेवारी) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत स्वराज संघटनेने भूमिका मांडली. यावेळी संघटनेचे करण गायकर म्हणाले की, सुरेश पवार हे कालपासून स्वराज्याचे घटक झाल्यामुळे स्वराज्य संघटना या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठिशी उभी राहणार आहे. 


सुरेश पवार यांच्या पाठिशी राहून मताधिक्याने निवडून आणण्याची आमची जबाबदारी : स्वराज्य संघटना


दरम्यान सुरेश पवार हे अपक्ष उमेदवार म्हणून नाशिक पदवीधर निवडणुकीत उभे आहेत. यावेळी करण गायकर म्हणाले की, स्वराज्य संघटनेचे ते अधिकृत उमेदवार जरी नसले तरी देखील स्वराज्याचे घटक असल्यामुळे आमची जबाबदारी आहे, की सुरेश पवार यांच्या पाठिशी स्वराज्याची ताकद उभी करुन त्यांना या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आणणे. राजकारणाच्या पक्षविरहित या निवडणुका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठीच केल्या होत्या की काही चांगले लोक निवडणुकीच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रश्न मांडतील, मात्र त्याला आता राजकीय वलय निर्माण झाले आहे. दरम्यान सुरेश पवार छत्रपतींचे विचार आणि स्वराज्य संघटनेचे नाव घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतील आणि निश्चितपणे मतदार देखील त्यांना पाठिंबा देतील, असा विश्वास गायकर यांनी यावेळी व्यक्त केला.


'दोन्ही पळपुटे उमेदवार'


स्वराज्य संघटनेचे गायकर म्हणाले की नाशिकचे दोन्ही प्रमुख उमेदवार हे पळपुटे असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला एका उमेदवाराला अजूनही पाठिंबा पक्षाचा पाठिंबा मिळत नसल्याचे टीका स्वराज्य संघटनेने केली आहे तर दुसरीकडे दोन्ही उमेदवार हे पक्षातून न लढता अपक्ष उमेदवारी करत असल्याने जनता काय ते ठरवेल. तसेच सध्या निवडणुकीत महत्वाचे दोन जे उमेदवार दाखवले जात आहे, ते पळकुटे उमेदवार असून त्यांनी पक्षासोबत निष्ठा नाही दाखवली तर जनतेसोबत काय दाखवतील. शिवाय पदवीधर निवडणूक ही निष्ठावांताची निवडणूक असते, त्यामुळे स्वराज्य संघटना पूर्ण ताकदीने सुरेश पवार यांना निवडून आणणार असा निर्णय संघटनेने केला आहे.