Nashik News : एकीकडे लोककला जगली पाहिजे, म्हणून लोककलावंतांनी जीवाचं रान केलं, मात्र याच लोककलावंताच्या जीवासाठी शासन मात्र उदासीन असल्याचे चित्र आहे. लोककलावंत पतीच्या विधवा पत्नीस मिळणाऱ्या मानधनासाठी वयोवृद्ध महिलेला नाशिकच्या (Nashik) जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण (Nashik ZP) विभागाकडून मंजूर मानधनासाठी गेल्या सात महिन्यांपासून चकरा माराव्या लागत आहेत.
आजही समाजात लोककलावंत उपेक्षित असल्याचे चित्र आहे. उभी हयात समाज जागृतीसाठी, लोककला जनसामांन्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्य वेचले. आज त्याच लोककलावंताना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र आहे. नाशिकच्या गिरणारे (Girnare) येथील कलगी-तुरा लोककलेतील जाणकार असलेल्या ज्येष्ठ लोककलावंत दिवंगत किसन वाघ यांना नाशिकच्या समाजकल्याण विभागाचे ज्येष्ठ कलावंत मानधन मिळत होते, त्यावर त्यांचा गुजारा होता. मात्र त्यांचे दमा विकाराने 2013 मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या विधवा पत्नीला पतीचे ज्येष्ठ कलावंत मानधन मिळण्याची तरतूद राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या निर्णयानुसार आहे.
रखडलेले मानधन आणि योजनेचा लाभ मिळण्याचे पत्र मिळाले, पण...
त्यानुसार विमल किसन वाघ (Vimal Kisan Wagh) या वयोवृद्ध महिलेने आपल्या मयत पतीच्या मृत्यू दाखल्यासह प्रस्ताव नाशिक पंचायत समितीकडे दाखल केला. मात्र प्रस्ताव पंचायत समितीकडून नाशिक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणकडे आल्यावर तो दोन वर्षे धूळ खाऊन पडला होता. चौकशी अंती तो प्रस्ताव सापडल्यावर त्यात त्रुटी काढून विधवा असलेल्या विमलबाईंना त्यांच्या पतीच्या वारस दाखल्यासाठी आग्रह धरण्यात आला. मात्र नाशिक तहसीलदार कार्यालयात त्यांना कित्येकदा अडवणूक करण्यात आली. मोठ्या प्रयत्नानंतर पूर्तता केल्यावर विद्यमान तहसीलदार दौंडे यांनी हे प्रकरण मार्गी लावले. संबंधित वारस दाखला नाशिक जिल्हापरिषद समाजकल्याणला दिल्यावर लोककलावंत मानधन समितीकडे विनवणी केल्यावर तो मंजूर करण्यासाठी 10 जून 2022 हा दिवस उजाडला. त्या मंजूर पत्रात मयत किसनराव यांच्या 2013 पासून आजपर्यंतचे रखडलेले मानधन रक्कम आणि यापुढे त्याच्या विधवा पत्नीस मानधन योजनेचा लाभ मिळेल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र मिळाले.
अद्याप एका दमडीचंही मानधन मिळालं नाही : विमलबाई वाघ
दरम्यान पत्र मिळून आजपावेतो सात महिने झाले, एक दमडी ही मानधन मिळाले नसल्याचे विमलबाई वाघ या वयस्कर महिलेने सांगितले. दरम्यान या कामी मी मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, तसेच नाशिकच्या मुख्यमंत्री सचिवालयात निवेदने दिली. कित्येकदा नाशिकच्या जिल्हापरिषदेला समाजकल्याणला पदरमोड करुन चकरा मारल्या. मात्र न्याय मिळाला नाही, योग्य दाद मिळत नाही. शेवटी म्हातारपणात शरीर साथ देत नसताना कामाला जाते, असे सांगत विमलबाई वाघ यांचे डोळे पाणावले.
लोकलावंत आजही उपेक्षित....
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना मानधन देण्याच्या योजनेकडे नाशिकमध्ये आवक लोककलावंतांची पाठ आहे. योजनेतील जाचक अटी, पूर्ततेसाठी असहकार्य यामुळे अनेक लोककलावंत या योजनेपासून वंचित आहेत. किसनराव वाघ यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंताने राज्यात कलगी-तुरा पोहोचवला अन् दारुबंदीच्या गाण्याने लोकोत्सव जिंकला. त्याच लोककलावंतांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्या पत्नीला मात्र पतीच्या मानधनासाठी होणारा छळ ही दुर्दैवी घटना आहे. अशी उपेक्षा म्हणजे योजनेतील मोठी त्रुटी आहे, यावर यापुढे जर्नलिस्ट फोरमकडून आवाज उठवू असे आवाहन आनंद पगारे यांनी केले.