Maharashtra MLC Election : विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून उमेदवारांकडून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार मतदारांना आवाहन करत आहेत. या निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेवर होणार असून हे मतदान कसे नोंदवावे, हे मतदारांनी समजून घेणे आवश्यक आहे. 


नाशिक (Nashik Graduate Constituency) पदवीधर मतदारसंघात नाशिकसह (Nashik) धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर हे महत्वाचे जिल्हे मोडतात. या जिल्ह्यातील पदवीधर मतदार या निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावतात. याच मतदारांवर उमेदवाराचा कौल असतो. यासाठी ही मतदान प्रक्रिया समजून घेणे महत्वाचे आहे. मत नोंदवण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन वापरु नका.


आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील ‘पसंतीक्रम नोंदवा’ या रकान्यात '1' हा अंक लिहून मत नोंदवा. एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी '1' हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा. निवडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रमांक आपणास उपलब्ध आहेत. उरलेल्या उमेदवारांकरता आपल्या पसंतीक्रमानुसार पुढील पसंतीक्रमांक अनुक्रमे 2, 3, 4 इ. नोंदवावेत.


पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत...


कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदवू नका. पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत, जसे की - 1, 2, 3, इ. पसंतीक्रम एक, दोन, तीन, इ. असे अक्षरी नोंदवू नका. अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये जसे की - 1, 2, 3, इ. किंवा रोमन लिपीमध्ये, जसे की- I, II, III, इ. किंवा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेच्या लिपीमध्ये पसंतीक्रमांक नोंदवता येतील.


पसंतीक्रम नोंदवणे केवळ ऐच्छिक...


तसेच मतपत्रिकेवर स्वाक्षरी करु नका, आद्याक्षरे लिहू नका, आपले नाव लिहू नका किंवा कोणताही शब्द लिहू नका. तसेच, मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नका. तुमचा पसंतीक्रम दर्शवण्यासाठी  '✔️' किंवा '✖️' अशा खुणा करु नका. अशा खुणा केलेल्या मतपत्रिका अवैध होतील. तुमची मतपत्रिका वैध ठरण्याकरता तुमचा पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे '1' हा अंक नमूद करुन नोंदवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम नोंदवणे केवळ ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघासह इतर मतदारसंघातील निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांना या सर्व नियमांचे अधीन राहून मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे मतदारांनी नियम समजून मगच मतदानाला जावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.