Jayant Patil NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचे हिवाळी अधिवेशानापर्यंत निलंबन केल्याने नाशिक (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली असून राष्ट्रवादी भवन येथे जोरदार निदर्शने केली. यावेळी “निर्ल्लज सरकारचा निषेध असो, '50 खोके एकदम ओके', 'ईडी सरकार हाय हाय' अशा घोषणा देण्यात आल्या.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. अधिवेशन कालावधी कमी असल्याने आपले प्रश्न मांडण्यासाठी विरोधक आमदार प्रयत्नशील असतात. परंतु सत्ताधारी अनेक प्रश्न बाजूला सारत असल्याने विरोधक आमदार आक्रमक होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची व महापुरुषांची बदनामी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या (suicide) आदि मुद्द्यांवर चर्चा होत नसल्याने तसेच दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सदनांत विधानसभा अध्यक्षांविरोधात असंसदीय शब्द वापरला.
दरम्यान सरकार पक्षाकडून अध्यक्षांबाबत आक्षेपार्य विधान केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र दुसरीकडे विरोधी पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांना उद्देशुन विधान नव्हते तर सरकारला जाब विचारण्यासाठी असे विधान केल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले जात आहे. मात्र या वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशानापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु हे विधान त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून न बोलता शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून बोलल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याची दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आंदोलन केलं जात असून नाशिकमध्ये देखील जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
काल सकाळच्या सत्रात विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील सभागृहात संतापले. या संतापात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जयंत पाटलांचं ट्वीट
निलंबनाच्या घोषणेनंतर जयंत पाटलांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. या निर्लज्ज 'सरकार' विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय...! असं दोन ओळींचं ट्वीट जयंत पाटलांनी केलं आहे. मला निलंबित केलं तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार असल्याचं ते म्हणाले. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर अजिबात चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.