Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात लाच (Bribe) घेणाऱ्या अधिकारी कमर्चाऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच  नव्या पोलीस आयुक्तांना (Nashik Police) येऊन काही दिवसच उलटले असताना पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाने लाच स्वीकारल्याचे (Bribe) प्रकरण समोर आले आहे. पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस नाईकास एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. 


एकीकडे नाशिक शहरात (Nashik City) वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असून अशातच पोलीस प्रशासनात लाचखोरीच्या घटना घडत आहेत. तेव्हा सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दुसरीडे नाशिकला नव्याने रुजू झालेल्या पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापुढे शहरातील गुन्हेगारीसह पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचारावर अंकुश लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यांनी पदाची सूत्रे हाती घेऊन आठवडा होत नाही तोच आयुक्तालय शेजारील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस नाईक संशयित मधुकर दत्तू पालवी यांनी गहाळ झालेल्या वाहनाच्या आरसी नोंद करून दाखला देण्याचे मोबदल्यात पाचशे रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगात ताब्यात घेतले.


दरम्यान मागील दोन दिवसांत नाशिकसह जिल्ह्यात लाचखोरीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनात मागील काही महिन्यात लाचखोरीचे प्रकरण समोर आले नव्हते. तत्पूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांत आडगाव व भद्रकाली या पोलीस ठाण्यांमध्ये लाचखोरीच्या घटना घडल्या होत्या. भद्रकाली पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस नाईक यांना रंगेहाथ पथकाने ताब्यात घेतले होते. तसेच आडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागला होता. यानंतर आता सरकारवाडा पोलीस ठाण्यातील अंमलदार अवघ्या पाचशे रुपयांची लाच घेताना सापळ्यात अडकला आहे. 


या प्रकरणात तक्रारदाराच्या चार चाकी वाहनाचे प्रादेशिक परिवहन विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र अनावधानाने गहाळ झाले होते. हे नोंदणी प्रमाणपत्र गहाळ झाल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यातील वस्तू गहाळ नोंदवहीमध्ये नोंद करून त्याचा दाखला मिळवण्यासाठी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र दाखला देण्याच्या मोबदल्यात  पालवी यांनी पाचशे रुपयांची लाच मागत ती स्वीकारल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिली. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील लाचखोरीला नवीन वर्षात लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना कठोर पावले उचलावी लागणार आहेत. पोलीस प्रशासनाची सूत्रे संपूर्णपणे आता नवीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती आले असल्याने शिस्त लावण्याचं काम व कायदा सुव्यवस्था बळकट करावी लागणार असल्याचे दिसते.


नाशिक जिल्ह्यासाठी चिंतेची बाब


दरम्यान मागील आठवड्यात नाशिकच्या महावितरण विभागातील तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर निफाडच्या महिला नायब तहसीलदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडल्या. निफाड तालुक्यातील निवासी नायब तहसीलदार कल्पना शशिकांत निकुंभ या महिला अधिकाऱ्यास 35 हजारांची लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले. अधिकाऱ्याचे नाव आहे. या महिला अधिकाऱ्याचे सोबत तहसील कार्यालयातील कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे याला देखील ताब्यात घेण्यात आले. लाचखोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नाशिक जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे.