Nashik Crime : आत्याच्या मरणाला कारणीभूत म्हणून ... नाशिकच्या डॉ. प्राची पवार हल्ल्याचा उलगडा
Nashik Crime : नाशिक शहरातील डॉ. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याचा उलगडा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
Nashik Crime : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरात डॉ. प्राची पवार (Prachi Pawar) यांच्यावर काही संशयितांची प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना घडली होती. अखेर या घटनेचा उलगडा झाला असून पंधरा दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आत्याच्या मरणाला कारणीभूत ठरवून त्याचा बदला घेण्यासाठी हा जीव घेणा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नाशिक शहरातील सुश्रुत हॉस्पिटलच्या मुख्य संचालक डॉ. प्राची वसंतराव पवार या त्यांच्या गोवर्धन शिवारातील आपल्या घरी पवार फार्म येथे जात असताना पवार फार्म हाऊसचे गेटवर त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनं संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली होती. अखेर या घटनेचा उलगडा झाला असून आत्याच्या मरणाला कारणीभूत ठरवून त्याचा बदला घेण्यासाठी हा जीवघेणा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी दुचाकी रस्त्यात आडवी लावून तो गाडीवरच बसला असल्याचे डॉ. प्राची पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी मोटर सायकल आडवी का लावली? अशी विचारणा केली असता, सदर संशयिताने रस्त्यातील गाडी न हटविता पवार यांच्याशी अरेरावीची भाषाकेली.
दरम्यान याचवेळी शेजारील पीकात लपून बसलेल्या आणखी दोन संशयित घटनास्थळी आले. त्यातील एकाने डॉ. प्राची पवार यांच्याशी वाद घालत हातातील लोखंडी धारदार कोयत्याने हल्ला केला. यावेळी डॉ. पवार यांनी आपल्या दोन्ही हातांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या गंभीर जखमी झाल्या, त्यांनतर तिघेही मोटर सायकलवर बसून तेथून पळून गेले. यानंतर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका डॉक्टर महिलेवर एकटे घरी जात असतांना झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नाशिक तालुका पोलिसांचा शोध सुरु असताना संशयित दुचाकीवर पळून जात असताना मोटर सायकलला अपघात झाल्याचे समजले. त्यानुसार संशयितांनी परिधान केलेले कपडे व वर्णनावरून पोलीस पथकाने नाशिक शहरात संशयितांचा कसोशीने तपास सुरू केला. संशयितांचे वर्णन तांत्रिक माहितीचे विश्लेषण व प्राप्त गुप्त माहितीचे आधारावर सदर संशयितांनी एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अभिषेक दिपक शिंदे, धनंजय अजय भवरे, पदन रमेश सोनवणे या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान संशयितांची चौकशी केली असता, त्यांनी 19 डिसेंबर रोजी गंगापुर रोड, गोवर्धन शिवारातील पवार हाऊस परिसरात येवून गेटवर थांबून डॉ. प्राची पवार यांना कारला मोटर सायकल आडवी लावून गाडी बंद असल्याचा बहाणा केला. त्यानंतर डॉ. पवार यांच्याशी अरेरावीची भाषा करून धारदार हत्यांवर जीवे ठार मारण्या उद्देशाने हल्ला केला असल्याची कबुली दिली.
बदला घेण्यासाठी हल्ला
संशयित अभिषेक शिंदे याची आत्या हया कोरोना काळात 12 मे, 2021 रोजी हॉस्पिटल येथे उपचार घेत असतांना मयत झाल्या होत्या. त्या गोष्टीचा राग मनात धरून संशयित अभिषेकने त्याचे साथीदार धनंजय भवरे व पदन सोनवणे यांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्याचे कबूल करून डॉ. प्राची पवार यांना अद्दल घडवायची या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करण्याचे ठरवले होते. त्यानुसार संशयित अभिषेक शिंदे याने भद्रकाली परिसरातून एक धारदार चॉपरसारखे हत्यार खरेदी केले होते. तसेच घटनेच्या दिवशी डॉ. प्राची पवार हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्यांचे गाडीचा पाठलाग करून पवार हाऊसच्या गेटवर पोहचून सोबत असलेल्या दोन साथीदारांनी डॉ. प्राची पवार यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याचे समोर आले आहे. सदर घटनेचा तपास करण्यासाठी 10 अधिकारी 40 पोलीस अंमलदार यांची दहा पथके तयार केली होती. अखेर पंधरा दिवसांच्या मेहनतीनंतर या संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.