Hemant Godse On Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यावर ताशेरे ओढले. हेमंत गोडसे हा चेहरा होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केल्यानंतर या प्रश्नाला गोडसे यांनी सडेतोड उत्तर दिले असून चेहरा महत्वाचा नसतो, तर काम महत्वाचं असत. शिवाय संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी असे ओपन चॅलेंजच गोडसे यांनी संजय राऊत यांना दिले आहे. 


संजय राऊत हे दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून त्यांनी काल शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले खासदार हेमंत गोडसे यांचा समाचार घेतला. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःची कबर खोदली असून आता त्यांनी निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं असं थेट चॅलेंज दिले. यानंतर आज खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या प्रश्नाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी, हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा' असं चॅलेंजचं एकप्रकारे गोडसे यांनी संजय राऊत यांना दिले आहे. त्यामुळे या राजकीय वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 


संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपसह शिंदे गटाची खरपूस समाचार घेतला. यातून खासदार हेमंत गोडसे हे देखील सुटले नाही. संजय राऊत म्हणले होते कि, 'शिवसेनेतून गोडसे शिंदे गटात गेले, हेमंत गोडसे हा चेहरा होता का? शिवसेना हाच नाशिकच्या लोकसभेचा चेहरा असणार. तसेच शिवसेनेत चेहरा वगैरे काही नाही. शिवसेना हाच चेहरा आणि शिवसैनिक हीच आमची ताकद आहे. शिवसैनिकच आमदार-खासदार निवडून देतात आणि ते आमच्यासोबत असल्याने आम्हाला चिंता नाही असे सांगत गोडसे यांनी स्वतःची कबर खोदली असून त्यांनी आता आगामी निवडणूक लढवून दाखवावी'  असे आव्हान दिले होते. 


दरम्यान आज हेमंत गोडसे यांनी शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेत संजय राऊतांच्या प्रश्नाला थेट उत्तर दिले आहे. गोडसे म्हणाले कि, शिवसेना हाच चेहरा, गोडसे चेहरा आहे का? तर चेहरा नाही तर काम महत्वाचं असतं. राऊत यांनी नाशिककरांच्या समस्या जाणून घेतल्या का? शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटले का? शहरातील उद्योजकांची बैठक घेतली का? कधी उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली का? या माणसामुळे संपूर्ण शिवसेनेचे वाटोळं झालं असून काँग्रेस राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपविण्याचे सुरु आहे. एकट्या माणसामुळे शिवसेनेची विल्हेवाट लागली. उद्धव, आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात करण्याचं काम राऊत करत असून त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत आहे, अशी खरामरीत टीका हेमंत गोडसे यांनी यावेळी केली. 
 
हेमंत गोडसेंच चॅलेंज 
ते पुढे म्हणाले कि, राऊत यांनी निवडणुकीचे चॅलेंज दिले, मात्र मी त्यांना चॅलेंज जातो कि, नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवा. हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा' मग सगळा सोक्षमोक्ष होईल, असं इशारा देखील यावेळी हेमंत गोडसे यांनी दिला. बाळासाहेबांच्या शिवेसेनेतून जो कोणी उमेदवार असेल त्यांच्यासमोर येऊन लढून दाखवावं. आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखे ते खासदारकी घेतात, मात्र काम काहीच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावण्याचे काम संजय राऊत केल्याचा घणाघात गोडसे यांनी यावेळी केला. तर संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली असल्याचेही ते म्हणाले.