(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Shivsena : नाशिकमध्ये शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, शिवसेना गोटात 'अस्वस्थता', पदाधिकारी मातोश्रीवर
Nashik Shivsena : नाशिकमध्ये (Nashik) शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक शिंदे गटाकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
Nashik Shivsena : नाशिकमध्ये (Nashik) शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक शिंदे गटाकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले. याच पार्श्वभूमीवर नाशिक मधले शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आज मुंबईमध्ये मातोश्री (Matoshree) निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची (Udhhav Thackeray) भेट घेणार आहेत. एका माजी नगरसेवकांने शिंदे गटात प्रवेश केल्या नंतर नाशिक मधल्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरल्याने या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झाला आहे.
नाशिक शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आज दुपारी बारा वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. नाशिक शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केल्याने नाशकात शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून आणखी काही नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याची चर्चा आहे आणि याच सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून डॅमेज कट्रोलचा प्रयत्न केला जाणार आहे. दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक नाशिकहुन मुंबईत जाणार आहेत.
शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला एकप्रकारे गळती लागली आहे. नगरसेवकांपासून ते खासदारापर्यंत अनेक जण शिवसेनेला (shiv sena) रामराम करीत आहेत. त्यातच नाशिकमधून सुरवातीला योगेश मस्के यांनी पाठींबा देत शिवसेनेतून बाहेर पडले. तर आता दोन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक असलेले प्रवीण तिदमे यांनी देखील शिवसेना पक्ष सोडून शिंदे गटाची वाट धरली. लागलीच शिंदे गटाकडून प्रवीण तिदमे यांना शिवसेना महानगरप्रमुखपद बहाल केले. यानंतर शिवसेना पदाधिकारी गोटात अस्वस्थता [पसरल्याचे दिसून आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांननी नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी माजी नगरसेवक यांच्या भेटी घेत शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले. तर आता या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नाशिकमधील (Nashik) पदाधिकारी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणर आहेत. कुणी कुठेही गेलं तरी आम्ही शिवसेनेसोबतच असणार आहोत, असे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सकाळी 12 वजता हे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. यामध्ये शिवसेनेचे माजी गटनेते विलास शिंदेसह 40 माजी नगरसेवक असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेनेचे जवळपास 40 नगरसेवकांसह पदाधिकारी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार हे सध्या शिंदे गटात आहेत. असे असतानाही आम्ही कायम शिवसेनेसोबत आहोत, असा विश्वास हे विलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
दसरा मेळावा शिवतीर्थावरच...
नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आणि राहील यासाठी आम्ही सर्व एक संघ असून दसरा मेळाव्याची आणि येणाऱ्या पुढील निवडणुकांची रचना या संदर्भात उद्धव साहेबांची बैठक घेऊन मार्गदर्शन घेणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना स्थापन झाली तेव्हापासूनचा शिवसेनाप्रमुखांचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होत असतो. या वेळेस नाशिकहून हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. आनंद आणि विचारांच सोनं वाटण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार असल्याचे विलास शिंदे म्हणाले.