Nashik Anand Dighe : आनंद दिघे (Anand Dighe) हे नाव आता घराघरात परिचित झाले असून धर्मवीर चित्रपटानंतर आनंद दिघे ठाणेकरांसाठीच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात दैवत मानले जाते. आज त्यांची जयंती आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये (Nashik) आनंद दिघे यांचे खंदे समर्थक असून आजही आनंद दिघे यांना देवघरात ठेवून पूजा करत असल्याचे दिसून येते.  


धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती (Anand Dighe Jayanti) निमित्ताने त्यांना अभिवादन केले जाते, असे काही कार्यकर्ते होते की जे आनंद दिघे यांना आजही त्यांना देव असं मानतात. नाशिककर शिरसाठ कुटुंबीय त्यापैकीच एक आहेत. नाशिक रोड परिसरामध्ये त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात असलेली एक खोली आजही आनंद दिघे यांच्या आठवणींची साक्ष देते. म्हणजे दिघे साहेबांचं जणू मंदिरच आहेत, असं ते मानतात. फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच ही खोली उघडली जाते. दिघे साहेबांच्या फोटोला इथे अभिवादन केलं जातं 


नाशिकमधील भास्कर शिरसाठ हे आनंद दिघेंचे एक खंदे समर्थक असून आनंद दिघे अनेक वेळा त्यांच्या घरी मुक्कामी देखील असायचे. भास्कर क्षीरसाठ यांनी स्वतःच्या घरी आनंद दिघे यांची एक खोली तयार करत त्या खोलीत दिघे साहेबांचा फोटो ठेवला असून दिघेंना ते देव मानतात. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशीच ही खोली दर्शनासाठी उघडली जाते. विशेष म्हणजे आनंद दिघे यांच्या नावावरुच शिरसाठ राहत असलेल्या परिसराला नाव देण्यात आलं आहे. एवढेच नाही तर त्यांच्या पुतण्याचेदेखील नाव आंनद ठेवण्यात आले आहे. नाव ठेवण्यासाठी ठाणेवरून नाशिकला आले होते. आज दिघे यांच्या जयंती निमित्ताने अनेक आठवणीना शिरसाठ यांनी उजाळा दिला असून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडायला नको हवं होतं अशीही प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना दिली आहे.



भास्कर शिरसाठ यांनी यावेळीच अनेक आठवणी ताज्या केल्या. आनंद दिघे साहेब हे माझ्याकडे यायचे, अनेकदा मुक्कामी राहायचे. आम्ही त्यांना देव मानतो, नाशिकमध्ये तुरुंगात असताना जवळपास साडे तीन महिने जेवण पुरवले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटल्यावर ते आमच्याकडे आले. त्यांना देव मानतो कारण ते त्यांना खोटं चालत नव्हतं, पैसे चालत नव्हते, कोणाचं काही घेणं देणं नाही, शब्दाला एकदम पक्के होते. कुठलंही काम असो एका शब्दावर करत असत. तुकाराम दिघोळे यांना निवडणुकीचं तिकीट हवं होते, एका मिनिटांत त्यांना तिकीट दिले होते, त्याचवेळी दिघोळे निवडून आले होते, दिघोळे निवडून आल्यानंतर आशीर्वाद घ्यायला आले होते. शिरसाठ यांनी एक प्रसंग सांगितला. एके दिवशी त्यांना जपण्यासाठी माळ नव्हती. ती माळ मिळत नव्हती. त्यावेळी रात्री तीन वाजता मित्राच्या मुक्तीधाम येथील दुकानात जाऊन त्यांनी माळ आणली होती, आजही ती माळ आमच्या बंगल्यात जपून ठेवलेली आहे अशी आठवण शिरसाठ यांनी सांगितली.


भास्कर शिरसाठ पुढे म्हणाले महाविद्यालय, शाळा प्रवेशासाठी एक रुपयाही लागायचा नाही, दिघे साहेबांच्या एका पत्रावर सगळं शक्य होतं. आज साहेब असते तर एवढं राजकारण झालं नसत. साहेबांचे शब्द कुठे जात नव्हते, असं कोणीच फुटलं नसतं, साहेब असते तर सगळ्यांना जमा केले असते, आनंद दिघे यांच्या नावात दरारा होता, एकनाथ शिंदे यांना आजही मानतो, पण त्यांनी असं करायला नको होतं. या सर्व गोंधळात एकनाथ शिंदे साहेबांचं चुकलं आहे. ते भाजपमध्ये गेले आहेत, मात्र भाजपला इतर पक्ष संपवायचे आहेत. त्याच्यासाठी हे सगळं राजकारण सुरू असल्याची खंत शिरसाठ यांनी बोलून दाखवली.