Nashik Graduate Constituency : जुनी पेन्शन योजना आणि सीएसडी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, नाहीतर मीसुद्धा कुठलीही पेन्शन न घेता सरळ राजकारणातून संन्यास घेईन असं आश्वासन नाशिक पदवीधरमधील (Nashik) अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी दिलं. 


नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduate Constituency) निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत चालली असून सुरेश पवार (Suresh Pawar) यांना स्वराज्य संघटनेने पुरस्कृत केलं आहे. शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा स्वराज्य संघटनेने केला असून प्राथमिक चर्चादेखील सुरू झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 


या दरम्यान उमेदवार सुरेश पवार म्हणाले की, पहिला अजेंडा असा होता की, आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीतील तोच अजेंडा घेऊन ते या निवडणुकीला सामोरे गेले. परंतु पुढे त्यावर काहीही केलं नाही, अधिवेशनात तारांकित प्रश्नसुद्धा उपस्थित केला नाही. तोच अजेंडा अद्यापही जसाचा तसा आहे. त्यामुळे यावेळी आम्ही छत्रपती संभाजीराजेंच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या नेतृत्वाने निश्चितपणे जुनी पेन्शन योजना आणि सीएसडी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. अन्यथा मी सुद्धा कुठलीही पेन्शन न घेता सरळ राजकारणातून संन्यास घेईन. नाशिक पदवीधर निवडणुकीतील उमेदवार काम करण्यासाठी इच्छुक पण दिसत नाही. 


दुसरीकडे उमेदवार सत्यजीत तांबे (satyajet Tambe) यांच्याविषयी बोलताना सुरेश पवार म्हणाले की, गेली पंधरा वर्षे सुधीर तांबे यांनी तीच आश्वासन दिलेली आहेत. पुन्हा मुलाने पण तेच आश्वासन द्यायचं याच्यावर मतदार किती विश्वास ठेवतील. एक वेळेस होऊ शकते, दोन वेळेस होऊ शकत, तीन वेळेस होऊ शकतं. पुन्हा तुम्ही चौथ्यांचा तेच कराल तर, तसं होणार नाही. नाशिक पदवीधर निवडणुकीतील मतदार हा सुज्ञ असून सुशिक्षित मतदार ही गोष्ट मान्य करणार नाही. यावेळेस निश्चितपणे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे दुसरा पर्याय उभा करून त्यांच्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे ते पवार म्हणाले. 


संभाजीराजे छत्रपती उद्या नाशिकमध्ये... 


स्वतः संभाजीराजे छत्रपती महाराज 28 तारखेला नाशिकला येत आहेत. त्याचबरोबर छत्रपतींना सगळ्या निवडणुकीची पार्श्वभूमी सांगितली असून संभाजीराजे छत्रपती आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते नाशिकमध्ये येत असल्याने महत्वाचा निर्णय होईल. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करू की फडणवीस यांच्याशी संवाद साधावा. आपला उमेदवार जर त्यांच्या पाठिंब्याने निवडून येत असेल तर आमची तयारी पूर्ण झालेली आहे. स्वराज्य संघटनेच्या ताकदीवर उमेदवार निवडून येईल, अशी 100 टक्के खात्री असून भाजपची मदत झाली तर चांगली गोष्ट असल्याचे सुरेश पवार म्हणाले.