Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला, इच्छुकांना आनंदाच्या उकळ्या
Gram Panchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चार तालुक्यातील 194 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम (Grampachayat Election) जाहीर करण्यात आला आहे.
Gram Panchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींची (Grampanchayat) रणधुमाळी सुरू असताना आता पुन्हा चार तालुक्यातील 194 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम (Grampachayat Election) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हाभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले असून पुढील महिनाभरातच नवा सरपंच मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. या ग्रामपंचायतींवर मागील काही महिन्यांपासून प्रशासक नेमण्यात आले होते. मात्र आता निवडणुकांचा बिगुल वाजल्याने जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यातील 194 ग्रामपंचायमध्ये निवडणूक रंगणार आहे. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील 5, त्र्यंबकेश्वर 58, सुरगाणा 61 तर पेठ तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्यात आतापर्यंत आरक्षणासह ग्रामपंचायतिसह प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. अशा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबविला जाणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यामध्ये निवडणूक होणार असून सदस्यांसह सरपंच देखील जनतेतून निवडणार असल्याने निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी या संदर्भातील अधिसूचना जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील कामकाजाला गती मिळणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. माघारी चा दिवस 30 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. आवश्यक असल्यास मतदान 13 ऑक्टोबर रोजी तर मतमोजणी 14 ऑक्टोबर ला होईल. पुढे निकालाची अधिसूचना 19 ऑक्टोबर ला काढण्यात येईल.
88 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया
नाशिक जिल्ह्यातील कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक प्रक्रिया सध्या राबविली जात आहे. येत्या 18 सप्टेंबर ला या ग्रामपंचायती साठी मतदान होणार असून आता नव्याने चार तालुक्यातील 194 ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांवर ताण येणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. उमेदवारांना 21 ते २७ सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर रोजी दुपारी 03 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत होईल.