Nashik Padvidhar Election : नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत दिवसेंदिवस मोठ्या घडामोडी घडत असून आता सत्यजित तांबे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा सत्यजित तांबे यांना विरोध असल्याची माहिती शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांची एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे सत्यजित तांबे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 


नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Padvidhar Election) अखेरच्या क्षणी डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) याना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole) यांनी तांबे पिता पुत्रांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने महत्वपूर्ण भूमिका घेत दिल्ली हायकमांडकडे कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली. तर आता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने देखील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणीत तर वाढ झालीच आहे, शिवाय अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक पदवीधर निवडणूक मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


यावेळी शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले की, सुधीर तांबे उमेदवार असते, तर मदत केली असती. मात्र सुधीर तांबे उमेदवार नसल्याने सत्यजित तांबे यांना पाठिंबा नाही. त्यामुळे इतर समर्थक पर्यायाचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सत्यजित तांबे हे महाविकास आघाडीचे उमेदवार नसल्याने विरोध होत आहे. टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज होणार प्राथमिक बैठक होणार असून 16 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शिवाय सत्यजित तांबे हे भाजपचे उमेदवार आहे हे ओपन सिक्रेट असून सत्यजित तांबे बंडखोर उमेदवार असल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षक सेनेने केला आहे. तसेच पदवीधर मतदार संघ हा कुणाचा सातबारा नाही, की बापानंतर मुलाने निवडणुकीला उभे राहावे, असा सणसणीत टोलाही यावेळी चव्हाण यांनी लगावला आहे. 


नाशिक पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट 


नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मोठा ट्वीस्ट पाहायला मिळाला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ऐनवेळी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावर काँग्रेस सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole News) यांनी घेतली आहे. उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. तर डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने दिल्लीतील हाय कमांडकडे मागणी केली आहे.