Nashik News : 'जाऊ तिथं खाऊ' हा मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांचा चित्रपट आठवतोय, या चित्रपटात विहीर चोरीला जाते, आणि सगळा चित्रपट या कथेभोवती फिरतो. असाच काहीसा प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यात घडला आहे. मालेगाव (Malegaon) तालुक्यातील टोकडे (Tokde Village) गावात 18 लाख रुपयांचा रस्ताच चोरीला गेला आहे. जवळपास वर्षभरापासून हा रस्ता शोधण्यात प्रशासन हतबल झाले असून अद्यापही या प्रकरणाचा उलगडा होऊ शकलेला नाही.. 


मालेगाव तालुक्यातील टोकडे या गावातील हा प्रकार असून साधारण वर्षभरापूर्वी म्हणजेच 29 ऑक्टोबर 2021 रोजी या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यांनतर 1 फेब्रुवारी 2022 रोजी वर्क ऑर्डर मिळाली. तर अवघ्या 35 दिवसात रस्ता तयारही झाला अन् 10 मार्च रोजी रस्त्याच्या कामाची सर्व देयके अदा केली. त्यानंतर खरे प्रकरण सुरु झाले. येथील स्थानिक रहिवासी असलेल्या विठोबा द्यानद्यान यांनी रस्त्याचं काम झालं का? याबाबत पाहणी केली. तर त्यांना कुठेही असा रस्ता आढळून आला नाही, काही ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी एप्रिल 2022 रस्त्याची शोधाशोध केली, मात्र रास्ता मिळून आला नाही. शेवटी त्यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला 3 जुलै रोजी रस्ता हरवल्याची तक्रार केली. 


त्यांनतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त यांना सदर रस्ता मिळून येत नसल्याचे लेखी निवेदन दिले. यानंतर चौकशी समिती नेमण्यात येऊन रस्ता असल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र द्यानद्यान यांनी यावर न थांबता थेट उपोषणाचे हत्यार उपसले. यावेळी मालेगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चौकशी करून अहवाल देऊ असे सांगितले. मात्र त्यांनी न सांगता अहवाल करून आले, तेव्हाही रस्ता असल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला दिली. दरम्यान वेळोवेळी द्यान द्यान यांनी पाठपुरावा केला, विशेष म्हणजे रस्ता शोधून देण्याऱ्यास सुरवातीला एक लाख, नंतर दोन लाख आणि आता चक्क पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले असल्याचे विठोबा द्यानद्यान यांनी सांगितले 


आता नुकतेच पुन्हा हे प्रकरण प्रशासनाकडे आले असून द्यानद्यान यांच्या तक्रारीची तब्बल सात महिन्यांनी जिल्हा परिषदेने दखल घेतली आहे. कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांनी त्यांच्या पथकाने पाहणी केली. त्यात कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी संबंधित गावबाहेर रस्ता अस्तित्वात असून तलाव ते शिवार रस्ता तोच असल्याचे नारखेडे यांनी म्हटले आहे. तसेच चौकशी केली असता रस्ता अस्तित्वात असून वापरात असल्याचा दावा कार्यकारी अभियंत्यांनी केला आहे. मात्र आता हा निर्णय जिल्हा परिषद सीईओ यांच्या कोर्टात हा चेंडू टोलवण्यात आला आहे, यावर आता सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. 


सीबीआय चौकशी करणार... 


दरम्यान मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील अठरा लाख रुपयांचा रस्ता हा कागदोपत्री दाखवण्यात आलेला आहे. तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून रस्ता अस्तित्वात असल्याचे सांगत सर्वसाधारण केली जात आहे. मात्र तो रस्ता खासगी शेतातील पांझण रस्ता असल्याने याप्रकरणी सोमवारपर्यंत सीईओ आशिमा मित्तल  यांनी समाधानकारक खुलासाना केल्यास रस्ता हरवल्याप्रकरणी थेट सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचा दावा तक्रारदार विठोबा द्यानद्यान यांनी केला आहे. हा रस्ता देखील गावांतर्गत नसून एका खाजगी शेतात तयार करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. तर हा रस्ता अस्तित्वात असल्याचे कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी सांगितले आहे. दरम्यान मित्तल यांनी तक्ररदार द्यानद्यान यांची बाजू ऐकून घेत कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल आल्यानंतर सोमवारी त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले असल्याचे द्यानद्यान यांनी सांगितले.


पाच लाखांचा बोर्ड जिल्हा परिषद समोर?


या प्रकरणी जिल्हा परिषद सीईओ यांनी पुन्हा चौकशीची मागणी करावी, कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांना माहिती वस्तुस्थिती दर्शक अहवाल देण्यात यावा. अन्यथा जिल्हा परिषद समोर पाच लाख रुपयांच्या बक्षिसांचा बोर्ड लावण्यात येईल असा इशारा तक्रारदार विठोबा द्यानद्यान यांनी दिला आहे.तसेच गावात दोन सभामंडप, संगणक कक्ष, महिला शौचालय देखील गायब असून ते देखील अस्तित्वात नसल्याचा आरोप द्यानद्यान यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सोमवारी निर्णय होणार असल्याने सीईओ काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.