Nashik Bajar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न बाजार (Nashik Bajar Samiti) समिती निवडणुकीत माघार घेतल्यानंतर राजकारण इरेला पेटलं असून इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समजते आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस (Nashik Taluka Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन गटातील राजकारण धुमसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी माघारीच्या दिवसानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पिंगळे आणि चुंभळे गट आमने सामने असून या दोन्ही गटामध्ये निवडणुक रंगणार आहे. माघारीनंतर आता प्रचाराला सुरवात झाली असून अशातच पिंगळे गटाचे समर्थक आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khosakar) यांना चुंभळे गटाकडून धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. याप्रकरणी चुंभळे गटातील प्रमुख नेतृत्वावर नाशिक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. 


दरम्यान दोन्ही गटाकडून प्रचाराला जोरदार सुरवात झाली असून अशातच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारावरून शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी थेट आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी चुंभळे गटाचे शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांच्यावर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आमदार हिरामण खोसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.


नाशिक कृषी बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना शिंदे गट असे चित्र असले तरीदेखील पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिक लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यानुसार इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे पिंगळे गटाकडून प्रचार यंत्रणेत सहभागी झाले आहेत. यावरूनच भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेत्यांकडून आमदार खोसकर यांना मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर येत आहे.


दोन्ही गटाकडून प्रचाराला सुरवात 


नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अर्ज माघारी शेवटच्या दिवशी व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी दाखल अर्जापैकी उमेदवारांनी माघार घेतल्याने या दोन जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार पिंगळे गटाने नाशिक कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समिती सरशी घेत 18 पैकी तीन जागा बिनविरोध निवडत विजयाचा श्री गणेशा केला आहे. अखेरच्या दिवशी एकूण 17 उमेदवारांनी माघार घेतल्याने बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात 15 जागांसाठी 37  उमेदवार रिंगणात आहेत.