Nashik News : कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता डेंग्यू, आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आढावा बैठक घेत नागरिकांनी घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचबरोबर डेंग्यू रुग्णांसह स्वाईन फ्ल्यू आजाराने डोके वर काढले आहे. शहरात दोघांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून या दोन्ही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सदर आजाराचह प्रादुभाव वाढू नये यासाठी रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचीही आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान शहर परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोगराई पसरण्याची भीती असल्याने महापालिकेने विविध प्रकारचे उपायोजना करून सर्व प्रकारच्या रोगावर नियंत्रण ठेवले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी केले आहे.
नाशिक महापालिका मुख्यालय पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर आयुक्त तथा प्रशासक पवार यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाहीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पावसाळ्यात उद्भवणारे संसर्गजन्य आजार काविळ, विषमज्वर, चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यु आदी बाबत मागील काही वर्षांच्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला. त्यानूसार सध्या कुठल्याही आजारांमध्ये सद्यस्थितीत वाढ झाली नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये व शंका असल्यास जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान कोरोनानंतर आता डेंग्यूचे जून महिन्यात अकरा रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर आता स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आल्याने नाशिकरांवर तिहेरी संकट आले आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी तातडीने बैठक घेत यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सेविका तसेच आशा, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत शहरामध्ये उपाययोजना राबविणे तसेच नागरिकांची साथरोगांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी पावसाळ्यात घ्यावयाच्या दक्षतेबाबत आयुक्त पवार यांनी पुढील प्रमाणे आवाहन केले आहे.
नागरीकांना आवाहन
डेंग्यु मलेरियाच्या डासांपासुन संरक्षण होण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. व पुर्ण अंगभर कपडे घालावे. डेंग्यु हा स्वच्छ पाण्यात वाढणा-या डांसापासुन पसरत असल्याने घरातील कुलर्स, फ्रिज आदी स्वच्छ ठेवावे तसेच घराच्या परीसरात पावसाच्या पाण्याची साठवण होईल असे भांडी, फुलदाणी ठेवु नये. आठवड्यातुन एकदा घरात पुर्ण कोरडा दिवस पाळण्यात यावा, साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करणा-या व औषधफवारणी करणा-या यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
नाशिक शहरातील स्थिती
नाशिक शहरातील आजारांचा आढावा घेतला असता जून 2021 मध्ये कॉलरा, कावीळ, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, कोरोना या आजारांचे अनुक्रमे 0, 2, 1, 40, 80, 0, 3293 असे आढळून आले होते. तर हेच प्रमाण जून 2022 मध्ये कॉलरा, कावीळ, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, कोरोना या आजारांचे अनुक्रमे 0, 0, 0, 11, 0, 2, 573असे आहे.