Nashik News : मागील अनेक वर्षांपासून बंद असलेले नाशिक शहरातील यशवंतराव चव्हाण तारांगण येत्या ०७ जुलैपासून सुरु होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी केली आहे. आयुक्त पवार यांनी यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरची पाहणी केल्यानंतर त्वरित येथील दुरुस्तीची कामे मार्गी लावून येत्या ०७ जुलैपासून तारांगण सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) वतीने उभारण्यात आलेल्या फाळके स्मारकात अत्यावश्यक सुविधांची व्यवस्था करून नागरिक व पर्यटकांसाठी खुले केल्यानंतर त्याला शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत पंधरा दिवसात साधारण दहा हजार पर्यटकांनी लाभ घेतला. त्याच प्रमाणे यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरही नागरिक व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने आयुक्त पवार यांनी आदेश दिले आहे. पाहणी दरम्यान आयुक्त पवार यांनी बांधकाम व मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्वरित सर्व बाहेरील परिसराची व तारांगणाची साफसफाई करून त्या ठिकाणी रंगरंगोटी करणे, तारांगण परिसरात लॉन्स विकसित करणे, तसेच त्या ठिकाणी असणारे यु.पी.एस.सिस्टम, बॅटरीची दुरुस्ती करणेची व्यवस्था त्वरित करण्याचे आदेश दिले. तर तिकीट विक्री केंद्रात बसण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मक्तेदाराच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर नागरिक व विद्यार्थ्यांसाठी गुरुवार पासून खुले करण्यात येणार आहे.


मुंबईच्या नेहरू तारांगणाच्या धर्तीवर नाशिकमध्येच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी तसेच नागरिकांना तारांगण उपलब्ध व्हावे यासाठी नाशिक महापालिकेने स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाशेजारी हे यशवंतराव चव्हाण तारांगण उभारले आहे. यासाठी विदेशातून साहित्य मागविण्यात आले होते. मात्र हे साहित्य अनेकदा देखभाल नसल्याने नादुरुस्त होत असल्याचे निदर्शनास आले होते. कधी प्रोजेक्टर तर कधी बॅटरी नादुरुस्त झाल्याने तारांगण दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र आता मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा तारांगणाला झळाळी मिळणार असून त्यामुळे इंगळ्या दोन वर्षांपासून बंद असलेले तारांगण अखेर सुरु होणार आहे. 


नाशिक महानगर पालिका आयुक्त रमेश पवार यांनी पाहणी करत अधिकारी कर्मचाऱ्यांना दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत. तसेच या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा त्वरित उपलब्ध करून देऊन येत्या 7 जुलैपासून तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. यामुळे मागील सुमारे दोन वर्षांपासून बंद पडलेल्या तारांगण पुन्हा सूरू होणार आहे.


ग्रहताऱ्यांचे कार्यक्रमही होणार सुरु 
यशवंतराव चव्हाण तारांगण सुरु झाल्यानंतर येथे ग्रहताऱ्यांचे शोजही दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये ब्रम्हांड, मिश्रीय सम्राटांचे तारे, अंतरिक्षाचा प्रवास, सृष्टीचा प्रकोप, गोष्टी ग्रहणाच्या, ताऱ्यांचे जीवनमान, चांदोबाच्या गोष्टी असे दहा ते बारा कार्यक्रम सुरु होणार आहेत. शिवाय हे कार्यक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांत उपलब्ध असणार आहे. यामुळे लहान मुलांसह इतरांना वैंज्ञानिक माहिती ग्रहताऱ्यांच्या शोच्या मदतीने शिकता येणार आहे.