Coronavirus Cases in India : हळूहळू देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 14 हजार 506 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळं देशात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. मंगळवारी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, आज पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
मंगळवारी देशात कोरोनाचे 11 हजार 793 नवीन रुग्ण आढळले होते. त्यापूर्वी सोमवारी देशात 17 हजार 73 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 602 वर गेली आहे. कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं नागरिकांचा चिंता वाढली आहे. त्यामुळं पुन्हा काही ठिकाणी नियमावली कडक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
राज्यात मंगळवारी 3 हजार 566 कोरोना रुग्णांची नोंद
दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी 3 हजार 482 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मंगळवारी दिवसभरात एकूण 3 हजार 566 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत काल सर्वाधिक म्हणजे 1 हजार 210 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात काल कोरोनामुळं पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77 लाख 91 हजार 555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झालं आहे. राज्यात काल एकूण 25 हजार 481 सक्रिय रुग्ण संख्या होती. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 11 हजार 988 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5 हजार 931 सक्रिय रुग्ण आहेत.