Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) सुरू असलेल्या जिल्हा परिषद (Nashik ZP) सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी वंदे मातरम् या गीतावर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. सीईओ आशिमा मित्तल यांनी थेट अस्सल मराठमोळ्या पद्धतीची नऊवारी साडी परिधान केली होती, तसेच डोक्यावर फेटा बांधून पूर्ण मराठी साज धारण केल्याने या गीताला तर उपस्थितांची विशेष दाद लाभली.
नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रीडा स्पर्धांचे (Sport Competition) आयोजन करण्यात आले असून गेल्या दोन वर्षात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे क्रीडा स्पर्धा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक वर्षांपासून घेण्यात न आलेल्या क्रीडा स्पर्धा यंदाच्या वर्षापासून पुन्हा सुरू झाल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. पुढील तीन दिवस या क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे सुरू आहेत. अशातच आज जिल्हा परिषद सांस्कृतिक स्पर्धेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (ZP CEO Ashima Mittal) यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी 'वंदे मातरम्' या गीतावर नृत्य करत देशातील विविधतेत एकतेचे दर्शन घडवले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील विविध संवर्गांच्या कर्मचाऱ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेतला. संध्याकाळी 6 वाजल्यापासून मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वैयक्तिक गायन, समूह गीत गायन, वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य या स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. याचवेळी जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत वंदे मातरम् या गीतावर सामूहिक नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितांनी या नृत्यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमावेळी प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी अनेक वर्षानंतर क्रीडा स्पर्धा होत असल्याने या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडाव्यात यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न करावे असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अनिरुद्ध अथानी यांनी प्रत्येकाच्या जीवनात खेळाचे महत्व अधोरेखित करत सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने कुठलातरी खेळ खेळणे आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी क्रीडा आणि सांकृतिक स्पर्धांच्या मागचा हेतू सांगत या वर्षापासून क्रीडा स्पर्धा या दरवर्षी घेण्यात येतील असे सांगितले. खेळ हा प्रत्येकाला यश अपयश पचवायला शिकवतो. त्यामुळे प्रत्येकाने खेळांमध्ये सहभाग घ्यावा असे सांगितले.