Nashik Padvidhar Election : नाशिक (Nashik) पदवीधरसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार शुभांगी पाटील आज सकाळपासून चर्चेत आहेत. त्यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाने देखील पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर (Nashik Padvidhar Election) निवडणुकीत आणखी रंगत येणार आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नेमक्या कोण आहेत, हे पाहुयात? 


तर काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यांसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर आदी जिल्ह्यांसाठी महत्वाची समजली जाणारी विधान परिषदेची नाशिक पदवीधर निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. शिवाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते आतापर्यंत राज्याचे राजकीय वातावरण या निवडणुकीने ढवळून निघाले आहे. अशातच सत्यजित तांबे यांच्या खेळीने मात्र सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले. जवळपास 29 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर यातील सात उमेदवारांना बाद ठरवत 22 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकीच एक म्हणजे शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या होय, विशेष म्हणजे या 22 उमेदवारांत एकमेव महिला उमेदवार आहेत. मूळच्या धुळ्याच्या असलेल्या आणि सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये पाटील या काम करतात. नाशिक पदवीधर साठी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


गेल्या आठ-दहा वर्षांपासून ते पदवीधर बेरोजगार आणि राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करत आहेत. तर महाराष्ट्र राज्य स्टुडन्ट व टीचर्स असोसिएशनच्या मागण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनही उभारले आहेत. राज्यातील सुमारे 15 ते 20 वर्षापासून बिना वेतन काम करणाऱ्या सुमारे 55 हजार विना अनुदानित बेरोजगार शिक्षकांसाठी सतत लढा देऊन दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजीचा शासन आदेश मिळवून शिक्षकांसाठी 20 टक्के आणि 40 टक्के अनुदान मिळवून दिले. विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने बंद केलेले अभ्यासक्रम पुन्हा सुरू केले. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली परीक्षा फी परत मिळवण्यासाठी आंदोलन केले. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी प्रत्यक्ष कागदपत्रांची पूर्तता करून समस्या मार्गी लावण्याचे काम त्यांनी केल्याचे जाहीरनाम्यातून सांगण्यात आले आहे. 


कोण आहेत शुभांगी पाटील? 
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रुक हे शुभांगी पाटील यांचं गाव. जळगाव जिल्ह्याचे माहेर, धुळे जिल्ह्याची सून, नंदुरबार जिल्ह्याचे आजोळ तर नाशिक जिल्ह्यातील वास्तव्य अशी पार्श्वभूमी असलेल्या शुभांगी पाटील या एकमेव महिला उमेदवार आहेत. शुभांगी पाटील यांचे शिक्षण बीए डीएड, एमएबीएड, एलएलबी झाले असून भास्कराचार्य संशोधन संस्था धुळे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन या संघटना त्यांनी स्थापन केल्या असून 2017 पासून पदवीधर मतदारांच्या समस्या आणि प्रश्नांसाठी त्या काम करीत आहेत. महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशन या संस्थानवर त्या प्रमुख सल्लागार आहेत. जळगाव येथील युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटीचे गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. तर नुकताच सप्टेंबर 2022 मध्ये शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता.