Nashik Sinnar Accident : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर-शिर्डी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मोठी अपडेट मिळाली असून विनाकारण तसेच कुठलीही सूचना न देता रस्त्यावर केलेले डायव्हर्जन दहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात (Sinnar Shirdi Highway) झाला. सिन्नरजवळील पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 45 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. तसेच उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील पाचव्या क्रमांकाच्या बसला हा भीषण अपघात (Major Accident) झाला. या अपघातात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी वावी पोलिसांनी खाजगी आराम बसला धडक देणाऱ्या ट्रकचालकासह सदर रस्त्याचे काम करणाऱ्या मोन्टो कार्लो प्रा. लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापक व देखरेख करणाऱ्या प्रतिनिधींविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या अपघातानंतर महत्वाची माहिती समोर आली असून विनाकारण तसेच कुठलीही सूचना न देता रस्त्यावर केलेले डायव्हर्जन करण्यात आले होते. वाहतूक वळवतांना सूचना दर्शक बोर्ड, स्पीड लिमीट बोर्ड, ब्लिंकर लाईट आणि ईतर सुविधा उपलब्ध न केल्याचाही ठेकेदार कंपनीवर आरोप ठेवण्यात आला आहे. सखोल तपास करत पोलीस उपनिरीक्षकानेच तक्रार दिली असून त्यानुसारच वावी पोलिसांनी खाजगी आराम बसला धडक देणाऱ्या ट्रकचालकासह सदर रस्त्याचे काम करणाऱ्या मोन्टो कार्लो प्रा. लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापक व देखरेख करणाऱ्या प्रतिनिधींविरोधातही गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळी सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन बसमधील दहा जणांचा मृत्यू झाला होता तर 26 प्रवासी जखमी झाले होते.
अपघातानंतर बस चालक चालक हा फरार झाला होता. त्या सायंकाळी उशिरा वावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दुसरीकडे रस्त्याचे काम करणाऱ्या एजन्सी कार्लो या कंपनीच्या व्यवस्थापकाने व देखरेख करणाऱ्या प्रतिनिधी यांनी शिर्डी कडून येणारा रस्ता विनाकारण बंद करून दोन्ही बाजूचे वाहतूक सिन्नर कडून शिर्डीकडे जाणाऱ्या एकाच मार्गावर वळवून एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. जीवित हानी होऊ शकते याची जाणीव असून देखील रस्त्याचे डायव्हर्जन केले. त्याबाबत कोणत्याही प्रकारची सूचना बोर्ड किंवा स्पीड लिमिट बोर्ड, ब्लिंकर लाईट अथवा इतर सुविधा न करता वाहतूक एकाच मार्ग वळवली. त्यामुळेच हा अपघात झाल्याचा तपास वावी पोलिसांनी करत संबंधित मोन्टो कार्लो कंपनीसह ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
अपघातांचे सत्र सुरूच
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरांसह जिल्ह्यातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यातच नाशिक-सिन्नर महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या मार्गावरही दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात पुन्हा एका अपघाताची भर शुक्रवारी पडली. या मार्गावर असंख्य वाहनांची वर्दळ असते, मात्र नेहमीच काही ना काही कारणास्तव किंवा रस्त्याच्या काम असल्याचे डायव्हर्जन दिले जाते, मात्र अशावेळी कुठलीही सूचना किनगाव फलक लावण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. अशातच शुक्रवारी सिन्नर -शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहेत.