Nashik News : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) पुन्हा एकदा अघोरी कृत्याचा प्रकार समोर आला असून जिल्ह्यातील बागलाण (Baglan) तालुक्यात अघोरी विद्येच्या नावाखाली आदिवासी तरुणांचा बळी (Death) घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नाशिकमध्ये अंधश्रद्धा खोलवर रुजल्याचे चित्र दिसू लागले आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आलियाबाद येथे एका भोंदू बाबांनी (Bhondu Baba) अघोरी विद्येच्या नावाखाली तालुक्यातील पिंपळकोठे येथील आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात (Jaykheda Police station) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण गोलचंद सोनवणे असे मृत तरुणाचे नाव असून तुळशीराम सोनवणे असे संशयित भोंदू बाबाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील प्रवीण सोनवणे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आलियाबाद येथील भोंदू बाबाकडे गावठी उपचार करण्यासाठी जात होता. भोंदू बाबाचे ही पिंपळकोठे येथे सोनवणे यांच्या घरी येणे जाणे होते.
दरम्यान सात दिवसांपूर्वी सोनवणे हा आलियाबाद येथे उपचारासाठी गेला होता, पण बाबाने अघोरीपणा करून सोनवणे याचा जीव घेत त्याला त्याच घरात टाकून बाहेर निघून गेला होता. सोनवणे घरी न आल्याने त्याचे नातेवाईक शोधू घेऊ लागले. नातेवाईकाने भोंदू बाबास कॉल केला. त्यावेळी त्यांनी प्रवीण बाहेर गेला आहे, झोपला आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. नातेवाईकांना संशय आल्याने याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता मृतदेह आढळून आला, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान साल्हेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आवारी यांनी घटनास्थळी जात शवविच्छेदन केले. मृत प्रवीण सोनवणे याचा मृत्यू कसा झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालातून समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर भोंदूबाबासह साथीदार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
गावकऱ्यांच्या लक्षात आला प्रकार
दरम्यान पिंपळकोठे येथील प्रवीण सोनवणे याचे घर आदिवासी वस्तीवर निर्जनस्थळी असून आजूबाजूचे ग्रामस्थ बाहेरगावी कामाला गेल्याने कुणाचे येणे जाणे नव्हते. मात्र गावातील महिला भिमाबाई सोनवणे व मोतीराम सोनवणे यांना भोंदूबाबा सोनवणे यांच्या घराजवळ निळ्या रंगाच्या माशा मोठ्या प्रमाणात दिसल्याने संशय आला. त्यांनी पोलीस पाटील शिवाजी जगताप यांना याबाबत माहिती दिली. जगताप यांनी जायखेडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानुसार जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पुरुषोत्तम शिरसाट, सहाय्यक अधिकारी संजय वाघमारे यांनी घटनास्थळी पाहणी करून प्रवीण सोनवणे याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. साल्हेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आवारी यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले.