Nashik Rain Update : गेल्या दहा दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला अवकाळी पावसाने (Unseasonal rain) अक्षरशः झोडपून काढले असून द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील द्राक्ष उत्पादकच सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. दहा दिवसातच अवकाळीमुळे जिल्ह्यातील 2 हजार 645 हेक्टरवरील द्राक्ष फळ पिकाला फटका बसला असून सर्वाधिक नुकसान दिंडोरी तालुक्यात झाले आहे. 


राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा (Temperature) तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा (Crop Damage) फटका बसला आहे. नाशिक मराठवाड्यासह (Marathwada) उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत.  कांदा, द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झालं आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्याती सर्वाधिक नुकसान झाले असून द्राक्ष पिकांसह कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानूसार 7 ते 16 एप्रिल या दहा दिवसातच अवकाळीमुळे जिल्ह्यातील 2 हजार 645 हेक्टरवरील द्राक्षफळपिकाला फटका बसला असून सर्वाधिक नुकसान दिंडोरी तालुक्यात झाले आहे. 



सध्या राज्यातील नागरिकांना सकाळी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळं आधीच संकटात सापडलेला बळीराजा पावसासह तापमान वाढीच्या इशाऱ्यामुळं चिंताग्रस्त झाला आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसात पाऊस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपीटीमुळे तालुक्यातील तब्बल 1 हजार 325 हेक्टरवरील द्राक्षबागा हा जमीनोदस्त झाल्या असून मोहाडी, जोपूळ, कुरनोली, खडकसुकेणे सह 37 गावातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत, निर्यातक्षम द्राक्षही ईथे मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. एकट्या दिंडोरी तालुक्यातच 160 कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान दिंडोरी खालोखाल निफाड तालुक्यात 641 तर सटाण्यामध्ये 514 हेक्टरवरील द्राक्षफळ पिक वाया गेले आहे.


आज हवामानाचा अंदाज काय?


दरम्यान मागील काही दिवसांपासून अवकाळीसह राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल नाशिक शहरात जवळपास 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडं तापमानात देखील दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाच्या तापमानात अधिक वाढ होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.