Nashik Climate : नाशिक  (Nashik) शहरात काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, त्यामुळे सकाळी अकरा वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तर दुसरीकडे रविवार कमाल तापमान 37.3 अंशांवर गेले आहे. त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होत असून नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या आहेत. तसेच सायंकाळी हवामानात बदल होऊन ढगाळ हवामान तयार होत असल्याने नाशिककरांना विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. 


नाशिक शहर आणि जिल्ह्यात (Nashik District)  गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) कहर केला आहे. अशातच उन्हाचा तडाखा देखील बसू लागला आहे. ऊन आणि अवकाळी पाऊस दोघांचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहे. मागच्या काही दिवसांचा विचार केला तर नाशिकमधील तापमान (Temperature) हे चाळीशीच्या आसपास येऊन ठेपले आहे. वाढत्या उन्हामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होऊन नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या. नाशिक शहरात रविवारी 37.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर येत्या काळात वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची खबरदारी घेण्याचे आवाहन तज्‍ज्ञांनी केले आहे. 


दरम्यान मार्च आणि एप्रिलच्या काही दिवसांत नाशिकला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. मात्र, अवकाळीसह वातावरणाची चढ-उतार कायम असल्याने उन्हाचा चटकाही जाणवतो आहे. एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांमध्येच पारा थेट 38.5 अंशांपर्यंत जाऊन ठेपला होता. परिणामी उन्हाने जिवाची लाहीलाही होत आहे. सकाळी अकरापासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे. तसेच दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वाधिक असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ग्रामीण भागातही उष्णतेचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांसह अन्य जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. 


असा आहे पाच दिवसाचे तापमान 


यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे मार्चसह एप्रिलचे दोन आठवडे तापमान सुसह्य गेले. दरम्यान मागील पाच दिवसांचा विचार केला तर मंगळवारी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर बुधवारी 37.8 अंश सेल्सिअस, गुरुवार 37.8 अंश सेल्सिअस, शुक्रवार 38.1 अंश सेल्सिअस, शनिवार 38.2 अंश सेल्सिअस, रविवार 37.3 अंश सेल्सिअस असं तापमान राहिलं आहे. त्यामुळे आगामी काळात ऊन वाढूही शकते. शिवाय अवकाळी, ढगाळ वातावरणाने येथील पारा सरासरी 36  ते 37 अंश सेल्सिअसवर स्थिरावण्याची शक्यता आहे. 


मालेगाव अद्याप चाळीशी आत 


उन्हाळ्यात मालेगाव शहराचे तापमान हे मार्चमध्ये चाळिशी पार करते. परंतु यंदा हे घडले नाही. येथील तापमान हे यंदा मार्च अखेर व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाळीशीच्या आत होते. 9 एप्रिलपासून सातत्याने तापमान हळूहळू वाढत आहे. परिसरात पाऊस होत असल्याने यंदा मार्च व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके फारसे जाणवले नाहीत. एप्रिलच्या प्रारंभी हलक्याशा झळा जाणवू लागल्या असतानाच कसमादे परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने हजेरी लावल्याने उष्णतेची लाट जाणवू शकली नाही. 


नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर


नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगला वाढला असून या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद  झाली असून काल तापमान 41 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. जिल्ह्यात अजून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे मे हिटचा अनुभव नंदुरबार कर नागरिक एप्रिल महिन्यातच घेत आहेत वाढत्या तापमानामुळे उकळा असह्य झाला आहे. सकाळी 9  वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी 12 नंतर रस्ते ओस पडू लागतात.