Nashik APMC Election : सर्वाचं लक्ष लागून असलेल्या नाशिक (Nashik) बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणूक पार पडली असून सभापतीपदी देविदास पिंगळे (Devidas Pingle) व उपसभापतीपदी उत्तमराव खांडबहाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर शिवाजी चुंभळे (Shiwaji Chumbhle) गटाने अर्ज दाखल न करता नूतन सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. तर 30 वर्षात प्रामाणिक काम केल्यामुळे सभासदांनी पुन्हा संधी दिल्याचे नवनिर्वाचित सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले. 


दरम्यान मागील महिन्यात जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. या सर्वात नाशिक (Nashik APMC Election) बाजार समिती निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या आणि अवघ्या जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष वेधलेल्या नाशिक कृषि उत्पन्न बाजार (Nashik Bajar Samiti) समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत विरोधी गटाने ऐनवेळी माघार घेतल्याने सत्ताधारी गटाचे देविदास पिंगळे यांची सभापतिपदी तर उत्तमराव खांडबहाले यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीपदी  देविदास पिंगळे, तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले बिनविरोध निवड झाली. 


त्याचबरोबर निवडणूक जाहीर होण्यापासून न्यायालयीन लढाईने गाजलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांमधून सभापती व उपसभापती पदनिवड झाली आहे. तत्पूर्वी काही संचालकांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार व न्यायालयीन कारवाईच्या पार्श्वभूमीवर सभापती पदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. तसेच संचालक फुटीच्या भितीतून देविदास पिंगळे व शिवाजी चुंभळे दोन्ही गटांनी आपल्या समर्थक संचालकांना गेल्या काही दिवसांपासून अज्ञातस्थळी रवाना केले होते. सभापती पदाच्या निवडणुकीसाठी हे संचालक शुक्रवारी परतीच्या प्रवासाला असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सुमारे 40 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


शेतकरी हितासाठी विरोधात बसून काम करू


दरम्यान विरोधी चुंभळे गटाने अर्ज दाखल न करता नूतन सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित सभापती पिंगळें यांनी गेल्या 30 वर्षात भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच सभासदांनी पुन्हा विश्वासाने सत्ता दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तर विरोधी गटाचे शिवाजी चुंबळे आणि अन्य 5 संचालकांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार होऊन शेतकरीहीत जोपासणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत शेतकरीहितासाठी विरोधात बसून काम करू, असे सांगितले. पिंगळे व खांडबहाले यांची निवड जाहीर होताच पिंगळे गटाने जोरदार जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी तथा (रोहयो) उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.