Nashik Crime : नाशिक शहरातही गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नसून शहरात पुन्हा एकदा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळाला आहे. शहरातील सिडको भागात रात्रीच्या सुमारास 12 ते 15 वाहनांची कोयत्याने (Koyata Gang) तोडफोड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संशयित अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मात्र सततच्या दहशतीने वातावरण भीतीदायक झाल्याचे चित्र आहे. 


नाशिक शहरात (Nashik) गुन्हेगारीचा आलेख चढताच असून नुकताच नव्या पोलीस अधिकाऱ्यांचा नाशिक पोलीस (Nashik Police) दलात समावेश झाला आहे. तर काही अनुभवी अधिकाऱ्यांना बढती देखील मिळाली आहे. मात्र असं असताना देखील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांना मात्र रोजचाच त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. अशातच काल रात्रीच्या सुमारास सिडको (Cidko) येथील पवननगर येथे दोन दुचाकींवर आलेल्या 7 टवाळखोर गुंडांनी हातात कोयते व लाकडी दांडक्यांनी 12 ते 15 दुचाकी आणि 4 ते 5 रिक्षांची व काही चारचाकींची तोडफोड करीत परिसरात दहशत माजविली असून स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीने कळस गाठला असून काल रात्रीच्या सुमारास या टोळक्याने गलोगल्लीत जाऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या टोळक्याकडे कोयत्यांसह इतर धारदार शस्रे होती. या शस्रांच्या माध्यमातून परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही सुजाण नागरिकांनी पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांना कळवूनही ते तत्काळ घटनास्थळी हजर न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, सदर प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने काही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 


पोलीस उशिरा आल्याने नागरिक संतप्त 


सिडको भागात गुन्हेगारी कमी होण्याची चिन्हे दिसत नसतानाच, पुन्हा एकदा पवननगर भागात टवाळखोर गुंडांनी दहशत माजवली. सप्तश्रृंगी चौक, स्वामी नारायण चौक या भागात रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवरून सात युवक आले होते. त्यांच्या हातात कोयते व लाकडी दंडुके होते. त्यांनी रस्त्यातील दुचाकींच्या काचा फोडल्या, काही दुचाकी रस्त्यावर पाडल्या, तर काही रिक्षांच्या, चारचाकींच्या काचा फोडल्या. शिवीगाळ करीत नागरिकांना धमकावीत ते पुढे निघून गेले. या प्रकाराबाबत काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळविले, मात्र नेहमीप्रमाणेच पोलिस उशिरा आले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रकार ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणी पोलिस चौकी आहे. मात्र ही पोलिस चौकी अनेक वेळा बंदच असते. तसेच येथील पोलिस गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचे कारवाई करताना दिसत नसल्याने सदर प्रकार पोलिसाना आव्हानच असल्याचे बोलले जात आहे.