Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून शहरातील पंचवटी परिसरात (Panchavati) बेकरीसाठी पीठ मळण्याच्या मशिनमध्ये अडकून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू (child Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा आणि पालकांनी घ्यावयाच्या काळजीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. 


घरात लहान मुलं असले कि एक किंवा दोन माणसे हमखास मुलांना सांभाळण्यासाठी आवश्यक असतात. लहान मुले कुठेही कधीही जात असतात, तसेच अनेक वस्तूकडे आकर्षित होतात, मात्र यापासून आपल्याला धोका आहे, हे त्यांना समजत नसल्याने अनेकदा अशा घटनांना सामोरे जावे लागते. यामुळे कुटुंबावर मोठा आघात होतो. त्यामुळे घरात लहान मुलं असल्यास पालकांसह कुटुंबीयांनी काळजी घेणे महत्वाचे असते. आता नाशिक (Nashik) शहरातील घटना मन सुन्न करणारी आहे. शहरातील पंचवटी परिसरातील इंद्रकुंड या भागात हि घटना उघडकीस आली आहे. 


दरम्यान परवा सायंकाळच्या सुमारास पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथील एका बेकरीमध्ये ही घटना घडली. रिहान उमेश शर्मा असे या चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता रिहान खेळत होता. घर परिसरातच बेकरीतील विविध पदार्थ एकजीव करण्यासाठी वापरण्यात येणारी गिरणी (ग्रँडर वा माऊंड मशिन) ठेवण्यात आलेली होती, मात्र काम बंद असल्याने ती देखील बंद होती. याचवेळी गिरणीच्या आजूबाजूला रिहान खेळत असताना तोल गेल्याने तो गिरणीत पडला. त्याच्या धक्क्याने गिरणी सुरु असल्याने त्यातल्या पात्यांसहित बेल्टमध्ये अडकून रिहानचे पूर्ण शरीर फ्रॅक्चर झाले. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्या!


एकीकडे धकाधकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अशातच अशा प्रकारच्या अनुचित घटनांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी घर ऑफिस सांभाळून मुलांकडे देखील लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा वस्तू गिळल्याने, अंगावर पाणी पडल्याने, हौदात पडल्याने, स्विमिंग पूलमध्ये पडून बालकांच्या मृत्यूच्या घटना सावर आल्या आहेत. यामध्ये पालकवर्ग आसपास असताना देखील अशा अनुचित घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहून मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे.