Nashik Bajar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह (Nashik Bajar Samiti) जिल्ह्यातील 14 बाजार समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून माघारीच्या दिवसानंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अनेक बाजार समिती निवडणूक पाहायला मिळणार आहे तर अनेक दिग्गजांचं भवितव्य देखील या निवडणुकीतून समोर येणार आहे. त्यामुळे आता पुढील आठ दिवसात उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काय फंडे आजमावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Bajar Samiti) अर्ज माघारीचा अंतिम दिवस राजकीय घडामोडींनी गाजल्याचं पाहायला मिळालं. यामुळे पुढील आठ दिवसात प्रचारादरम्यान बाजार समिती काबीज करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांमध्ये जोरदार टशन पाहायला मिळणार आहे. राजकीय पक्षांनीही बाजार समितीच्या निवडणुकीत दंड थोपटले असून नाशिक बाजार समितीत पिंगळे, चुंभळे यांचे शह काटशहाचे राजकारण याचबरोबर तर बाजार समिती निवडणुकांत देखील चुरशीची निवडणूक होणार असल्याची चिन्हे आहेत. 


दरम्यान नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अर्ज माघारी शेवटच्या दिवशी व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी दाखल अर्जापैकी उमेदवारांनी माघार घेतल्याने या दोन जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार पिंगळे गटाने नाशिक कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समिती सरशी घेत 18 पैकी तीन जागा बिनविरोध निवडत विजयाचा श्री गणेशा केला आहे. दरम्यान आता अखेरच्या दिवशी एकूण 17 उमेदवारांनी माघार घेतल्याने बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात 15 जागांसाठी 37  उमेदवार रिंगणात आहेत. तर मनमाड बाजार समितीचे 18 जागांसाठी 30 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. तत्पूर्वी माघारीच्या अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.


देवळा, पिंपळगावंच काय? 


देवळा कृषी उत्पन्न बाजार (Deola) समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी 18 पैकी आठ जागा बिनविरोध तर उर्वरित दहा जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. जवळपास 129 उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पैकी 103 उमेदवारांनी माघार घेतली. पिंपळगाव बसवंत कृषी (Pimplagaon) उत्पन्न बाजार समितीच्या माघारीच्या दिवशी 268 पैकी 227 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 41 उमेदवार राहिले आहेत. शेतकरी विकास पॅनल व लोकमान्य परिवर्तन पॅनल या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. त्यामुळे आता अकरा जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात असल्याने पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक देखील रंगतदार होणार असल्याची शक्यता आहे.


सुरगाणा बाजार समितीवर माकपचे वर्चस्व 


घोटी बाजार समितीच्या निवडणुकीत 159 अर्ज दाखल झाले होते त्यापैकी माघारीच्या दिवशी 115 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 149 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 126 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी माघारी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी देखील माघार घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे आता 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सुरगाणा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शांततेच पार पडल्या आहेत. यात माकप प्रणित किसान विकास प्रगती पॅनलचे 17 पैकी 16 जागा उमेदवार निवडून आले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मोहन गांगुर्डे हे एका जागेवर निवडून आले आहेत. माकपने विजयाची परंपरा कायम राखली असून गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सुरगाणा बाजार समितीवर माकपचे वर्चस्व आहे आणि या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ते दिसून आले आहे.