Nashik Crime : नाशिक (Nashik) ग्रामीण भागातील गुन्हेगारी सातत्याने वाढत असल्याचे अधोरेखित होत आहे. शहरात तर सामान्य नागरिकांची सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत असताना जिल्ह्यातील अनेक भागांत घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थही भीतीच्या सावटाखाली आहे. अशातच इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील खंबाळे गावात महिलेसोबत दुर्दैवी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेतेचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिलेवर हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील खंबाळे (Khambale) येथील ही संताप आणणारी घटना घडली आहे. खंबाळे येथील विश्राम गृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीच्या पाण्यात सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास 40 वर्षीय महिला नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती. याच वेळी येथे दबा धरून बसलेल्या काही इसमांनी या महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. बराचवेळ झाला तरी मुक्ताबाई अजुन घरी का परतली नाही, हे पाहण्यासाठी कुटुंबातील सदस्य खदाणी जवळ गेले असता ही घटना उघडकीस आली. कुटुंबातील लोकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरीक घटनास्थळी दाखल झाले.
रविवार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खंबाळे गावातील 40 वर्षीय विवाहिता कपड़े धुण्यासाठी विश्रामगृहालगत खाणी जवळ जात असताना अज्ञात इसमाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समजते. संशयिताने तिच्या डोक्यात दगडाने प्रहार करून तिला जीवे मारले. नागरिकांना ही घटना समजताच त्यांनी एका संशयितास पकडून पोलिसांच्या हवाली केले. या घटनेत तिघांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून, दोघे फरार आहेत. संतप्त नागरिकांसह मृताच्या नातलगाच्या आक्रोशाला पोलिसांना सामोरे जावे लागले. दरम्यान या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. संशयितावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी तब्बल 7 तास घोटी पोलिस ठाण्यात ठिय्या धरला होता.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे घोटी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत होते. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. घटनेनंतर खंबाळे, घोटी परिसरातील नागरिकांसह मृत महिलेच्या नातलगांनी घोटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आक्रोश केला. संशयितांना ताब्यात द्या, सर्व संशयितांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. पोलिस प्रशासन संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. आमदार हिरामण खोसकर यांनी पोलिस अधीक्षकांशी चर्चा करत संशयितांवर कारवाईची मागणी केली.
ग्रामस्थांचा संताप अनावर
खंबाळे येथे सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहाच्या परीसरात रोजच अनेक मद्यपी दारु पिण्यासाठी बसत असल्याने जणू काही मद्यपींचा अड्डाच बनला आहे. येथे दिवसभर मद्यधुंद अवस्थेत मद्यपी वावरतांना दिसतात. मात्र यावर कोणाचाच अंकुश नसल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे. त्याचबरोबर या परिसरात गावठी मद्याचा धंदा सुरू होता. हा धंदा बंद करावा, यासाठी खंबाळे ग्रामपंचायतीने वेळोवेळी मागणी केली होती. मात्र हा धंदा बंद झाला नाही, यामुळेच ही घटना घडल्याचे जमावाने सांगितले.