Nashik News : नाशिक (Nashik) शहरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असून अशातच देशातील महत्वाची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला ग्राहकाने चुना लावला आहे. बोगस खाते उघडून शहरातील एनडी पटेल रोडवरील स्टेट बँकेच्या (State Bank) शाखेला 86 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अलीकडे सगळे व्यवहार ऑनलाईन (Online Fraud) झाल्याने अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यात नागरिकांसह आता बँकेला सुद्धा भूर्दंड बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच नाशिक शहरात (Nashik) फसवणुकीची मोठी घटना घडली आहे. गृह कर्ज मंजूर करत बांधकाम व्यावसायिक म्हणून बोगस बँक खाते उघडून त्यात ती कर्जाची रक्कम वर्ग करून स्टेट बँकेच्या एन डी पटेल रोड शाखेला तब्बल 86 लाख रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये (Bhadrakali Police) दाखल झाली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि बँक व्यवस्थापक प्रकाश सावंत यांच्या तक्रारीनुसार जानेवारी 2021 मध्ये संशयित विवेक उगले याने बँकेत गृह कर्ज मिळवण्यासाठी पाच कर्जदारांची कागदपत्रे दिली होती. यासोबतच बांधकाम व्यावसायिकाचे साठे खते दिले होते. तसेच कर्जदारांच्या पेमेंट स्लिप जोडल्या होत्या. बँकेकडून पाच ग्राहकांचे 86 लाखांचे गृह कर्ज मंजूर करून ते वर्गही करण्यात आले होते. दोन वर्षांपासून कर्जदार अजय संजय आठवले, रोशनी जयस्वाल, संतोष जयस्वाल, राजू कलमपट्टी, अश्विन साळवे, किरण आठवले हे कर्जाचे हप्ते भरत नसल्याने बँकेकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यालाही उत्तर न मिळाल्याने बँकेतील अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली असता पेमेंट स्लिप रहिवासी पत्ते सगळे खोटे असल्याचे दिसून आले. संबंधित व्यावसायिकाची चौकशी केली असता त्याच्या नावाने बिजनेस बँक आणि शिरपूर बँकेत बोगस खाते उघडल्याचे समजले.
अशी केली फसवणूक
विवेक उगले याने गृह कर्ज मंजूर होत नाही, अशा व्यक्तींना हेरून वेतन स्लिपमध्ये बदल केला. बनावट नाव घेत शहा नामक बांधकाम व्यवसायिकाचे साठे खत जोडून बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर करून, बोगस बँक खाते उघडून सर्व रक्कम संशयिताने खात्यात वर्ग करून घेतली. संशयिताने बोगस कागदपत्रांच्या आधारे गृह कर्ज मंजूर केले. कर्जदारांच्या वेतन स्लिप मध्ये फेरफार केला. बोगस खाते उघडले, या आणि अशा प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस एम पिसे यांनी सांगितले.