Nashik Water Supply : नाशिक (Nashik) शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) तुडुंब असताना पुढील दोन दिवस शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहीती मनपा प्रशासनाने (Nashik NMC) दिली आहे. त्यामुळे नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आला आहे. 


नाशिक शहरात पावसाने उघडीप दिल्याने पाईपलाईन (Water supply) दुरुस्तीची कामे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील काही महत्वाच्या जलशद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात येत आहे. शहरातील पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी (Panchavati) जलशुध्दीकरण केंद्र आवारातील 900 मिमी व 500 मिमी रॉ वाटर व्हॉल नादुरुस्त झाला आहे. सदरचे व्हॉलचे दुरुस्तीचे काम शुक्रवार (दि. 05) रोजी हाती घेणेत येणार असल्याने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा प्र क्र 1, 4, 5 व 6 मधील संपूर्ण भागात तसेच प्र क्र 3 मधील काही भागात शुक्रवार (दि. 05) रोजीचा दुपारचा/ सायंकाळचा व शनिवार (दि. 06) रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. 


तसेच शनिवार (दि. 06) रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. याबाबत प्र क्र 1 मधील संपूर्ण म्हसरुळ परिसर, प्र क्र 4 व ५ मधील संपूर्ण मखमलाबाद रोड/पेठ रोड/दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्र क्र 6 मधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसर तसेच प्र क्र 3 मधील हिरावाडी व लगतचा परिसर इत्यादी परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान तांत्रिक दु्रूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पुढचे दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी नाशिककरांनी आवश्यक पाण्याची साठवणूक करावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे. 


या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा 
पंचवटी परिसरातील प्रभाग 01 मधील संपूर्ण म्हसरूळ परिसर, 4 व 5 मधील संपूर्ण मखमलाबाद परिसर, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर, तसेच प्रभाग क्रमांक 06 मधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 


मागील दोन दिवसही दुरुस्ती 
गंगापुर डॅम येथील मनपा वॉटर पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सबस्टेशन मध्ये अचानक बिघाड झाल्याने दुरुस्तीकरीता (दि.02) रोजी पहाटे 1.15 ते 2.10 या वेळेत खंडीत झालेला होता. तसेच गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन येथील ए टाईप पंपाची मेन कॉमन हेडर लाईन अचानक दुपारी लिकेज झालेली असल्याने तातडीने दुरुस्ती करिता दुपारी 02 ते 05 या कालावधीत पंपीग बंद करण्यात आलेले होते . या कारणांमुळे मंगळवार (दि. 02) रोजीचा सकाळ सत्र व सांयकाळचा पाणी पुरवठयावर परीणाम झालेला आहे. व बुधवार (दि.03) रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने करण्यात आला होता. त्यानंतर आता पंचवटी विभागातील दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने या विभागत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती मनपाने दिली आहे.