Menstruation Festival : मासिक पाळी (Menstrual cycle) म्हटलं कि आजही समाजात याबाबत अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. ये शिवू नको, ते करू नको, हे करू नको, विटाळ हा आणखी एक शब्द वापरला जातो. मात्र या सर्वाना चपराक देत नाशिकमधील (Nashik) एका वडिलांनी आपल्या लेकीच्या पहिल्या मासिक पाळीचा महोत्सव साजरा केला आहे. 


आजही स्त्रीला समाजात वावरतांना अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागते. त्यातीलच एक म्हणजे मासिक पाळी होय. चारचौघात वावरत असताना असे लक्षात येते की मासिक पाळी हा शब्द सर्वांसमोर बोलण्याची किंवा ऐकण्याची अजून आपल्या समाजाला सवय नाही. एवढेच काय तर तर ज्या घरात मुलगी अथवा महिला लहानाची मोठी होत असते, त्या ठिकाणी देखील त्या 'ते चार दिवस' म्हणजे कुणीही समजून घेणार नसते. अशावेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाने या गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. याची सुरुवात तर आधी घरातून झाली पाहिजे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 


दरम्यान हेच पूर्वग्रह, मासिक पाळी विषयीच्या गैर समजुतींना मूठमाती घालण्यासाठी नाशिकमधील एका वडिलांनी आपल्या मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचा महोत्सव करायचा ठरवलं आहे. मासिक पाळीच्या दिवसात मुलीच्या, महिलेच्या मनातील अपराधीपणाची भावना पुसून काढण्यासाठी, तसेच मासिक पाळीच्या बाबतीत समाजात प्रबोधन व्हावे या दृष्टीने  सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असणारे कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या लेकीच्या मासिक पाळीच्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. तसेच अनेकांना निमंत्रण देत या विषयावर समाज जागृतीसाठी चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान आणि स्नेहभोजन अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जातपंचायत मूठमाती अभियान या दोन्ही संस्थांद्वारे राज्यस्तरावर काम करणारे कृष्णा चांदगुडे यांनी लेक यशोदा हिच्या मासिक पाळीच्या महोत्सवाचे आयोजन केले. 'मासिक पाळी' या विषयाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कोष नावाची शॉर्ट फिल्म, मासिक पाळीच्या संदर्भातील गाणी, अभंग, व्याख्यान आदींच्या माध्यमातून मासिक विषयी जागर मांडण्यात येणार आहे. 


आजही स्रियांना आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते. या असंख्य संघर्षांपैकी मासिक पाळीशी निगडित असलेले सामाजिक आणि शारीरिक गैरसमज हा सुद्धा महत्त्वाचा संघर्ष आहे. त्यामुळे याबाबत पालकांसहित समाजाने सजग होणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने महोत्सव साजरे होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कृष्णा चांदगुडे यांनी उचलले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. 


दरम्यान याविषयी चांदगुडे म्हणाले कि, मासिक पाळी विषयी समाजात अनेक गैरसमजुती आहेत. खऱ्या अर्थाने मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया असून हा समजून घेण्याचा विषय आहे. जोपर्यंत स्वतःच्या घरातून या विषयाला वाचा फुटत नाही, तोपर्यंत मासिक पाळीविषयीच्या बाबत समाजात असणाऱ्या गैरसमजूतींना वाचा फुटणार नाही, त्यामुळे हे पाऊल उचलले आहे.