Nashik Leopard : नाशिककरांनो कुठलीही खात्री न करता सोशल मीडियावर 'बिबट्या आला रे आल्याची' पोस्ट तुम्ही फॉरवर्ड करत अफवा पसरवणार असाल तर सावधान. कारण आता अशा अफवा पसरवणाऱ्यांवर वनविभाग (Nashik forest) थेट गुन्हे दाखल करणार असून त्यासाठी सायबर पोलिसांची देखील मदत घेतली जाणार आहे. बिबट्या (leopard) फिरतोय, अशा अफवा, पसरवणाऱ्यांवर व अन्य ठिकाणांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियाद्वारे व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिले आहेत. 


नाशिकची (Nashik) ओळख सध्या बिबट्याची माहेरघर अशी होऊ पाहते आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियातील (Social Media) अफवांनाही चांगलेच पेव फुटले आहे. नाशिकरोड परिसरात कधी झाडावर बिबट्या बसल्याचे फोटो तर कधी एखाद्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या पोस्टमुळे वनविभागाचे अधिकारी कर्मचारी हैराण झाले आहेत. कॉल किंवा व्हॉटसऍपवर (WhatsApp Post) पोस्ट येताच वनविभागाचे पथक सदर घटनास्थळी जाऊन सर्च ऑपरेशन करतात. मात्र हाती काहीही लागत नाही. गेल्या दहा दिवसात रोज कुठे ना कुठे जाऊन अशाप्रकारे शोध मोहीम केली जाते आहे. एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता नागरिकांना अफवा पसरवू नका, असे आवाहन वनविभागाकडून केले जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 


नाशिक शहरातील जयभवानी रोडच्या परिसरात बिबट्याच्या संचाराचे चुकीचे फोटो (leopard Rumors) व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने वनविभागासह रहिवाशांच्याही नाकीनऊ आले आहेत. बुधवारी संध्याकाळी अशाच प्रकारे झाडावर बसलेल्या बिबट्याचा फोटो हा भालेराव मळ्यातील असल्याचे व्हायरल झाल्याने या भागात वनविभागाच्या पथकाने धाव घेतली. यावेळी रहिवाशांनी त्यांच्याभोवती गराडा टाकला होता. हा फोटो या संपूर्ण परिसरातील नाही, असे वनाधिकाऱ्यांनी पटवून सांगितले. जयभवानी रोडच्या परिसरात बिबट्या फिरतोय, अशा अफवा, पसरविणाऱ्यांवर व अन्य ठिकाणांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियाद्वारे व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिले आहेत. 


खबरदार अफवा पसरवालं तर... 


काही दिवसांपूर्वी जयभवानी रोडवर जॉगर्स दाम्पत्याला बिबट्याने दर्शन दिले होते. यानंतर आठवडाभरापूर्वी याच भागातील गुलमोहर कॉलनीत बिबट्याने पादचाऱ्याला जखमी केले होते. यानंतर बिबट्या लष्करी हद्दीतील जंगलात स्थलांतरीत झाला; जयभवानी रोडच्या परिसरात मागील दहा दिवसांपासून बिबट्याच्या कोठेही पाऊलखुणा दिसलेल्या नाहीत. मात्र, चुकीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केले जात असल्याने वन विभागासह रहिवाशीही वैतागले होते. बुधवारी संध्याकाळी अशाप्रकारे भालेराव मळ्यातील एका झाडावर बसलेल्या बिबट्याचा चुकीचा फोटो व्हायरल करण्यात आला होता.  मात्र अफवांचे पेव फुटल्याने वन विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.


ईतर संबंधित बातम्या : 


Nashik Leopard : बिबट्यानं 15 मिनिटात चारदा झडप घातली, त्यानंही शेवटपर्यंत झुंज दिली, सिन्नरच्या विष्णूसोबत थरारक प्रसंग