Nashik Nikhil Bhamare : काही महिन्यांपूर्वी शरद पवारांविषयी (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्ट करणारा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा (Satana) येथील निखिल भामरे याची भाजपच्या आयटी सेलमध्ये सहसंयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यावेळी त्याने वादग्रस्त पोस्ट केली होती, त्यावेळी त्याचा भाजपशी संबंध जोडण्यात आला होता. त्यावेळी भाजपकडून साफ नकार देण्यात आला होता, मात्र आता थेट नवी जबाबदारी देण्यात आल्याने सोशल मीडिया कसा हॅण्डल करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भामरे हा भाजपचा (BJP) पदाधिकारी झाला आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी निखिल भामरेची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निखिल भामरेवरती दिंडोरी, पुणे, बारामती, ठाणे, कळवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सात गुन्हे दाखल झाले होते. आणि तो 50 दिवस तुरुंगातही होता. भाजपकडून सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भामरे याच्याही नावाची वर्णी लागली आहे. त्यात 1 संयोजक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे 5 सह संयोजक आहेत, त्यात निखिल भामरेला स्थान मिळाले. या सहा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विभागावर नेमण्यात आले असून इतर संयोजक आणि सह संयोजक नेमण्यात आले आहेत. पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरेला भाजपाने बक्षिसी दिलीय का? अशी चर्चा सुरू आहे.
काय नेमकं प्रकरण होते?
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील निखिल भामरे हा फार्मासिस्ट तरुणानं शरद पवारांविरोधात सोशल मीडीयावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. ज्यात म्हटलं होतं की, 'वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. बाराचाकाका माफी माग' या आशयाचं ट्वीट भामरेनं केलं होतं. त्यावेळी निखिलवर, दिंडोरी, पुणे,बारामती, ठाणे, कळवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी 7 गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर तो जवळपास 50 दिवस जेलमध्ये होता. आता हाच निखिल भामरे भाजपची सोशल मीडियाची बाजू सांभाळणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इतर संबंधित बातम्या :