Nashik News : खाजगी डॉक्टर रुग्णांच्या जिवाशी कसा खेळ करतात हे पुन्हा एकदा नाशिकमध्ये समोर आलं आहे. एका 59 वर्षीय रुग्णाच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी चक्क त्यांचा डावा पाय कापण्यात आला आणि यामुळे संबंधित रुग्ण दोन्ही पायाने अधु झाले आहेत. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करताना आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याकडून खूप त्रास दिला गेल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. नक्की काय घडलं जाणून घ्या.


खाजगी डॉक्टरकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ


नाशिकच्या जेलरोडवरील दसक भागात राहणारे सुभाष खेलूकर, वय 59 वर्ष. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ते सिनियर फिटर या पदावर काम करतात. 2014 साली त्यांचा दुचाकीवर एक अपघात झाल्याने त्यांच्या उजव्या पायात रॉड टाकण्यात आला होता. मात्र तो रॉड चालताना दुखत असल्याने तो रॉड काढून टाकण्यासाठी 20 मे 2023 ला नाशिकरोड परिसरातील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले. 


उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी डावा पाय कापला


हॉस्पिटलमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विपुल काळे यांनी उजव्या पायाचा एक्स रे काढण्यास सांगितले. तसेच ब्लड, युरीन टेस्ट, इ.सी.जी., सोनोग्राफी अशा सर्व टेस्ट करायला सांगितल्या. त्या सर्व टेस्ट करून रिपोर्ट डॉक्टरांकडे सादर करताच डॉक्टरांच्या सांगण्यानुसार 26 मे रोजी खेलूकर ऍडमिट झाले आणि 27 तारखेला दुपारी दीडच्या सुमारास ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना नेण्यात आले. तिथे जाताच एका सिस्टरने त्यांच्या उजव्या पायावर लाल रंगाच्या पेनाने बाणासारखी निशाणीही केली त्यानंतर भूलतज्ज्ञ आले आणि त्यांनी सहा ते सात हॉस्पिटल स्टाफच्या उपस्थितीत त्यांना भुलीचे इंजेक्शन दिले. जवळपास अडीच तासानंतर ऑपरेशन थिएटरमधून सुभाष खेलूकर यांना बाहेर आणण्यात आले. मात्र, पुढे काय समोर आले ते तुम्हीच ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.


नेमकं घडलं काय?


सुभाष खेलूकर यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितलं की, "मला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले. डॉक्टर विपुल काळे यांनी पत्नी आणि मुलाला सांगितलं की, तुमच्या पेशंटचे ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे, परंतु त्यांच्या डाव्या गुडघ्यावर ब्लेड पडल्यामुळे दोन टाके पडले आहेत, त्याला बँण्डेज लावले आहे, ते पाहून तुम्ही घाबराल म्हणून तुम्हाला आगोदरच सांगत आहे.' असे सांगितले. हा काहीतरी विचित्र प्रकार वाटताच बँडेड खोला, असं मुलाने सांगताच डाव्या पायावर पाच टाके पडल्याचे निदर्शनास आले आणि हे बघताच माझे घरचे घाबरले. माझी भूल उतरल्यानंतर मला जाणवायला लागले होते की, माझे दोन्ही पाय काम करत नाहीत म्हणून मला आता बसता येत नाही, मांडी घालता येत नाही, वॉकर घेऊन चालावे लागते. डॉक्टरांचा हा सर्व निष्काळजीपणा आहे. आमच्या डोळ्यात त्यांनी धूळफेक केली."


गुन्हा दाखल करण्यातही अडचणी


या संपूर्ण प्रकारानंतर डॉ. विपुल काळे आणि मॅग्नम हॉस्पिटल प्रशासनाला धडा शिकवण्याचा निर्णय खेलूकर कुटुंबाने घेतला. उपनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार देताच नाशिक जिल्हा रुग्णालयाकडून तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात येऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि अखेर अपघाती ब्लेड पडल्यामुळे डाव्या पायावरील त्वचा तंतोतंत कापू शकत नाही तर ऑपरेशनच्या दृष्टीनेच ते कापण्यात आल्याचं कारण समोर येताच उपनगर पोलीस ठाण्यात तीन दिवसापूर्वी मॅग्नम हॉस्पिटलच्या डॉ. विपुल काळे यांच्यावर जवळपास दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा गुन्हा दाखल व्हावा यासाठी या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. 


हे नुकसान कसं भरायचं?


आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याकडून त्यांची फरपट करण्यात आल्याचं खेलूकर यांच्या पत्नीनं सांगितलं आहे.  खेलूकर यांच्या पत्नी पुष्पलता खेलूकर यांनी सांगितलं की, "गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी दोन महिन्यात 20-25 वेळा सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन आली, उपनगर पोलीस स्टेशनला 30 वेळा जाऊन आली असेल. पत्र मिळालं का, अहवाल आला का? असे विचारत फिरायचे. कारवाई व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडेही पोस्टाने अर्ज केला, अजून उत्तर आले नाही. डॉक्टरकडून चूक झाली तर त्यांनी मान्य करावी आणि नुकसान भरपाई द्यावी. पारदर्शी कारभार हॉस्पिटलचा व्हावा. सामान्य नागरिकांनी काय करावं?"


खाजगी हॉस्पिटलवर कोणाचंच नियंत्रण नाही?


त्यांनी पुढे सांगितलं की, "घरात अपंग मिस्टरांना सोडून मी चकरा मारायचे कार्यालयामध्ये. मिस्टरांच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला की ते आता म्हणतायत मी मेलो तरी चालेल पण आता हॉस्पिटलमध्ये नेऊ नका, हे नुकसान कसं भरायचं? माझी पुढची मागणी अशी आहे की, एकट्या डॉक्टरवर नाही मॅग्नम हॉस्पिटलचे संचालक, पूर्ण प्रशासनावर कायदेशीर कारवाई व्हावी. तुम्ही पोलीस स्टेशनला जा, सिव्हिलला जा नाहीतर आयएमएला जा आमचं काही होत नाही, असे मला सांगायचे. मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं सध्याच्या अधिवेशनात पण आरोग्य विभागाच्य या कारभारावर लक्ष द्यायला हवं. खाजगी हॉस्पिटलवर कोणाचे नियंत्रण नाही का? पेशंट एडमिट केल्यावर 50 ठिकाणी सह्या घेतात. तुम्ही माणसाला मारण्याचे काय लायसन्स घेतले का? गुन्हा दाखल करणं एवढं सोपं नाही, हे मी स्वतः अनुभवले."


दरम्यान, ज्या हॉस्पिटलच्या डॉक्टरवर हा गुन्हा दाखल झाला आहे, त्या मॅग्नम हॉस्पिटलच्या प्रशासनाचे यावर काय म्हणणं आहे? हे देखील आम्ही जाणून घेतलं. मॅग्नम हॉस्पिटलचे सीईओ देवेंद्र दाबक यांनी सांगितलं की, ''ऑपरेशन दरम्यान एक ब्लेड पडून कापले गेले होते, जखम झाल्याने टाके टाकले होते. या अपघाताबाबत डॉक्टर काळे आणि प्रशासनाने सगळी समज नातेवाईकांना दिली होती. खूपच वरवरची जखम होती त्यामुळे टाके टाकले. डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस चौकशी करतायत, आम्ही पण आमची बाजू मांडू. पेशंटच्या दैनंदिन जीवनावर याचा कुठलाही परिणाम झालेला नाही.'' 



एकीकडे मॅग्नम हॉस्पिटल प्रशासन जरी हे स्पष्टीकरण देत असले तरी, मात्र आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याने डॉक्टरांची चुक होती हे जवळपास सिद्ध झालं आहे. फक्त डॉक्टरच नाही तर हॉस्पिटल प्रशासनावरच कारवाईची मागणी आता नातेवाईक करत असल्याने पोलीस आता कुठल्याही दबावाविना पुढील चौकशी करणार का? अशाप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या खाजगी डॉक्टरांवर नियंत्रण कुणाचे? आरोग्य विभाग या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? हेच हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.