Nashik Leopard : नाशिकची (Nashik) ओळख बिबट्याचे माहेरघर अशी होऊ पाहत असतांनाच शेतकऱ्यांमध्ये सध्या बिबट्याची कमालीची दहशत बघायला मिळते आहे. रोज कुठे ना कुठे बिबट्याचा वावर दिसून येत असतांनाच एका तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने (leopard) केलेल्या हल्ल्याच्या थरारक घटनेमुळे नाशिक सध्या हादरून गेलंय. एकाचवेळी या बिबट्याने तरुणीवर चारदा झडप घातल्याचे त्याच्या बोलण्यातून समोर आले आहे. 


नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील (Sinnar) नायगावमध्ये विष्णू तुपे वास्तव्यास आहे. विष्णू हा शेतकरी असून शनिवारी रात्री शेतातील कामे आटोपून तो घरी आला होता, त्यानंतर गावचा बाजाराचा दिवस असल्याने भाजी घेण्यासाठी आईला त्याने आपल्या दुचाकीवर बसवून बाजारात सोडले. मात्र, आईला सोडून गाई बांधण्यासाठी घरी परतत असतांनाच त्याच्यावर जो प्रसंग ओढावला तो ऐकून अंगावरही काटा उभा राहील. विष्णू तुपे म्हणाला कि, 'आईला सोडून मी प्लॅटिना दुचाकीवरून घरी येत असतांनाच घरापासून 500 मीटर अंतरावरच उसाच्या शेताजवळ रस्त्याच्या किनारी बसलेल्या बिबट्याचे (Leopard Attack) डोळे गाडीच्या लाईटच्या प्रकाशात चमकले. बिबट्या दिसताच मी गाडी रेस करून पुढे पळून जात असतानाच बिबट्याने माझ्या अंगावर झेप घेतली. 


"त्यामुळे मी खाली पडलो, त्यानंतर जबड्याने त्याने माझी मांडी पकडली. मी कशीबशी सुटका केली. त्यानंतर मी गाडी उचलून खाली आदळू म्हणजे त्या आवाजाने बिबट्या (Nashik Leopard) पळून जाईल, असे ठरवताच मी गाडी आर्धी उलचतच त्याने परत माझ्यावर हल्ला केला. तो दूर जायचा आणि डरकाळी फोडत परत माझ्या अंगावर धावून यायचा, असे चार वेळा त्याने केले. बिबट्या थोडा दूर जाताच जीव मुठीत धरून मी घराकडे पळालो. मी भाऊ भाऊ असा ओरडत होतो, घरच्यांची आठवण यायची, आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. विष्णू यांची आई हिराबाई तूपे म्हणाल्या की, देवामुळे आज माझा बाळ वाचला. माझ्या मुलासाठी तो बिबट्या टपून बसला होता, असेच माझ्या मनात राहिले असते. माझ्या बाळावर, मुलावर जी वेळ आली ति कुणावरच येऊ नये.. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आर्त सादही या माउलीने घातली". 


अंगावर काटा उभा राहिला... 


विष्णूने दाखवलेलं धाडस, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेला आक्रोश आणि दुचाकीची तुटलेली किक पेट्रोलच्या टाकीवर आदळत केलेल्या आवाजामुळे विष्णूने बिबट्याच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचवला. विष्णू तुपेवर ओढवलेली ही आपबिती ऐकून अंगावर पण काटा उभा राहीलाच असेल तर मग विचार करा, विष्णूच्या आईची काय परिस्थिती झाली असेल. बिबट्याने 15 मिनिटात चार वेळा केलेल्या या हल्ल्यात विष्णूच्या डाव्या काखेत, डाव्या पायाच्या मांडीवर तसेच मानेला जखम झाली आहे. सध्या त्याच्यावर सायखेडा परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून जखम खोलवर आणि गंभीर असल्याने बरी होण्यास किमान सात दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे डॉक्टर सांगत आहे. 


बिबट्याबाबत जनजागृती महत्वाची 


विष्णूला घायाळ करणारा तो बिबट्या वनविभागाच्या हाती अद्याप लागलेला नसून या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भाग असो किंवा शहरी परिसर रोज कुठे ना कुठे बिबट्याचा वावर नाहीतर हल्ला केल्याच्या घटना या कानी पडत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात वनविभाग कमी पडत असल्याचं बघायला मिळत आहे. 


 


इतर संबंधित बातम्या :