Nashik Girish Mahajan : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना काँग्रेस पक्षाने (Congress) निलंबित केल्याने ते बाहेर पडले आहेत. त्यामुळे ते पक्षाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्टपणे मांडत आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचं वजन पाहता ते भाजपमध्ये आले तर त्याचा भाजपाला नक्कीच फायदा होणार असल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन (Girish Mahajan) हे जळगाव जिल्ह्यातील (Jalgoan) जामनेर तालुक्यात शेंदुर्णी येथे एका भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे. ते यावेळी म्हणाले कि, सत्यजीत तांबे यांना पक्षाने एबी फॉर्म देताना तो दुसराच दिल्याचं सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) सांगत आहेत. हा त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा विषय असल्याने त्यात आपण काही बोलत नाही, मात्र सत्यजित तांबे यांना त्यांच्या पक्षाने निलंबित केल्याने ते अपक्ष झाले आहेत. आज ते काँग्रेसमध्ये राहिले नसल्याने ते काँग्रेसच्या विरोधात स्पष्टपणे आपली भूमिका मांडत आहेत.
ते पुढे म्हणाले, तांबे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले कि, भविष्यात देखील अपक्ष राहणार. त्यामुळे सत्यजीत तांबे जर भाजपामध्ये (BJP) येणार असतील तर त्याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील, मात्र सत्यजीत तांबे यांचं राजकीय क्षेत्रातील वलय पाहता ते भाजपामध्ये आले तर त्यांच स्वागत करायला हरकत नाही, त्याचा भाजपाला नक्की फायदा होणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य पाहता आगामी काळात सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर नवल वाटायला नको. तसेच आव्हाड प्रकरणांवर ते म्हणाले कि, जितेंद्र आव्हाड काय बोलले हे माहित नाही, मात्र जितेंद्र आव्हाड हे प्रसिध्दीमध्ये राहण्यासाठी नेहमीच वादग्रस्त विधाने करत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
गिरीश महाजनांचा झुंबा डान्स व्हायरल..
तर दुसरीकडे धुळे शहरात गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज आज पाहण्यास मिळाला. धुळे शहरात संपन्न झालेल्या 'हिट धुळे, फिट धुळे' या मॅरेथॉन स्पर्धेत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी झुंबा डान्स केल्याचे पाहायला मिळाले. या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने 'हिट धुळे फिट धुळे' मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी झुंबा डान्स आयोजित करण्यात आला होता. सकाळी साडेपाच वाजता मंचावर झुंबा डान्स सुरू झाला. त्यावेळेस गिरीश महाजन यांनी मंचावरती हजेरी लावली. त्याच वेळेस इतर स्पर्धकांसोबत आणि आयोजकांसोबत गिरीश महाजन यांनी मंचावरती झुंबावर ठेका धरल्याने उपस्थित सर्वांनीच झुंबा डान्सचा आस्वाद घेतला.