Nashik Aditya Thackeray : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर येत असताना अशातच पुन्हा एकदा ठाकरे गटाला नाशिकमधून सुरुंग लागला आहे. जवळपास 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा समजते आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
आजपासून चार दिवस आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकसह (Nashik) औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. यातील दोन दिवस ते नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र अशातच आज ठाकरे गटातून पन्नासहून अधिक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाकरे गटाला दणका दिला आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गट (Thackeray Sena) डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी वेळोवेळी संवाद दौरे-मेळावे घेत आहेत. तर दुसरीकडे त्यात सुमारास शिंदे गटात प्रवेश करण्याची संख्या देखील वाढत आहे.
नाशिकचा बालेकिल्ला म्हणून शिवसेनेची ओळख आहे. मात्र सत्तांतरानंतर हे चित्र पूर्णतः बदलला असून शिवसेनेत दोन वेगवेगळे गट पडले आहेत. त्यातच ठाकरे गटातून शिंदे गटात दर 15 दिवसांनी किंवा एक महिन्याने इन्कमिंग होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यापूर्वी अजय बोरस्ते भाऊसाहेब चौधरी यासारख्या दिग्गज नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. तर आता आदित्य ठाकरे हे नाशिकला येत असताना जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे समजते आहे. दुपारी साडेबारा एक वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून पुन्हा एकदा ठाकरे गटासाठी ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान ज्या ज्या वेळी शिवसेना ठाकरे गटातील नेते नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्या त्या वेळी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचे सोहळे होत आहेत. मागील दोन वेळा संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले असताना ठाकरे गटातून महत्त्वाचे शिलेदार हे शिंदे गटात गेले होते. तर आता खुद्द आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येत असताना दुसरीकडे 50 हून अधिक शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. एकीकडे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना अशा पद्धतीने ठाकरे गटातून एक एक करत अनेकजण शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोल नक्की होतंय का? यावर ठाकरे गटाला चिंतन करावे लागणार हे नक्की.
डॅमेज कंट्रोल करण्यात अपयश?
नाशिकमध्ये शिंदे गट ठाकरे गट वाद सत्तांतरानंतर चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश होत आहेत. असे असताना दर महिन्याला ठाकरे गटातून शहरात बैठका, संवाद होत आहेत. विशेष म्हणजेच यासाठी स्वतः संजय राऊत देखील दोन वेळा येऊन गेले आहेत. मात्र तरीदेखील डॅमेज कंट्रोल रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहेत. आता आदित्य ठाकरे नाशिकला येत असताना 50 हून अधिक जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे हे प्रवेश सोहळे रोखण्यासाठी ठाकरे गटाला विशेष मोर्चेबांधणी करावी लागणार असल्याचे दिसते.