Nashik News : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरातील पंचवटी परिसरात वन्यजीव प्राण्यांची अवशेष जप्त करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता वनविभागाकडून दिंडोरी तालुक्यातील अक्राळे शिवारात मुंगसाची शिकार करणाऱ्या संशयितांना जेरबंद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, हे संशयित गुजरातमधून (Gujrat) दिंडोरी तालुक्यात मजुरीसाठी आले असताना त्यांनी मुंगसाची शिकार केली आहे. 


नाशिकच्या दिंडोरी (Dindori) तालुक्यातील उमराळे शिवारातील न्याहारी डोंगराच्या वनक्षेत्रात (Dindori Forest) मुंगूसाची शिकार करणारे पाच संशयित जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. नाशिक कळवण रस्त्यालगत ऐतिहासिक न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी राखीव वनक्षेत्र आहे. काही दिवसांपासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्याचबरोबर गुजरातमधील काही संशयित हे दिंडोरी तालुक्यातील या वनक्षेत्रात असून यांनी दोन मुंगसांची शिकार केल्याचे वनविभागाला समजले. वनविभागाने तात्काळ न्याहारी डोंगर वनक्षेत्र गाठून पळून जात असलेल्या या संशयितांना शिताफिने ताब्यात घेतलं. यात पंडित काशिनाथ दिवा ऋतिक अर्जुन भोगे, तेजस कासू रिजड, संतोष अर्जुन भोगे अशी संशयितांची नावं आहेत. हे सर्व गुजरातमधून मजुरीसाठी दिंडोरी परिसरात आले होते.


एकीकडे वन्यप्राण्यांची शिकार करणे कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. मुंगुस या वन्यप्राण्याला वन्यजीव संरक्षण कायद्यातील नवीन सुधारणेनुसार संरक्षण अनुसुची-1मध्ये स्थान दिले गेले आहे. यामुळे आता मुंगुसाची शिकार करणे म्हणजे वाघाच्या शिकारीप्रमाणेच गंभीर मानली जाते. दिंडोरी तालुक्यात मजुरीच्या उद्देशाने आलेल्या या पाच जणांच्या टोळीने मात्र दिंडोरी वनपरिक्षेत्रांतर्गत अक्राळे येथील न्याहारी डोंगरावरील वनात जाऊन दोन मुंगूसांना ठार मारले. याबाबतची गोपनीय माहिती वन गस्ती पथकाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी, वनपाल अशोक काळे यांच्या पथकाने तातडीने अक्राळे शिवारातील न्याहारी डोंगर गाठला. तेथील राखीव वनात सापळा रचून पाचही संशयितांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


....अन्यथा वनविभागाकडून कठोर कारवाई


दरम्यान या संशयितांना दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिवाय अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी दिंडोरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत वनविभागाच्या पथकाकडून संशयितांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. याबाबत दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी म्हणाल्या की, दिंडोरी तालुक्यात द्राक्ष, उसाची बागायती शेती केली जाते. या शेतीच्या कामासाठी मजुरवर्ग हा महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील आदिवासी गावांमधून शक्यतो दाखल होत असतो. यामुळे अशा मजुरांनी शेतीचा बांध सोडून जंगलात बेकायदेशीर प्रवेश करू नये. तसेच जंगलात जळतणसाठी वृक्षतोड, रानससे, घोरपड विविध पक्षी अथवा वन्यप्राण्यांची शिकारीसारखे गुन्हेगारी कृत्य करू नये, अन्यथा वनविभागाकडून कठोर कारवाई केली जाईल.