नाशिक: कांद्याने (Onion)  शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.  नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याची आवक तर वाढली आहे. मात्र कांद्याची मागणी कमी असल्यानं कांद्याचे दर घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरासरी 600-700 रुपये भाव शेतकऱ्यांना मिळत असून खर्चही भरून निघत नाही.  त्यातच देशांतर्गत मागणी कमी झाली असून निर्यात ही जवळपास बंदच असल्यानं कांद्याचं करायचं काय असा सवाला शेतकऱ्यांना सतावतोय. 


दोन दिवसांपूर्वी याच मुद्यावरुन चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. मात्र येत्या काही दिवसांत असाच उद्रेक अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे, व्यापाऱ्यांकडूनही त्याची आर्थिक पिळवणूक केली जाते आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असून विरोधकांकडूनही सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरले जाते आहे. दरम्यान, सर्व परिस्थिती बघता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहित नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात येऊन कांद्याला योग्य तो भाव देण्यात यावा अशी मागणी केली आहे.


कांद्याचे दर कसे कमी होतात? शेतकऱ्यांचा सवाल


कांद्याचे महागडे बियाणे आणि रोपे त्याच्यासोबत कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई अनेक बाबींचा सामना करत आम्ही कांद्याची लागवड करतो. मात्र जेव्हा आमचा कांदा काढणी होऊन बाजारात जातो तेव्हा कांद्याचे दर कसे कमी होतात असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहे. त्यामुळे कांदा लागवड सोडून देण्याचा विचार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी करत आहे.  


कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात


महागडी औषधी खते वाढलेले मजुरीचे दर पाहता लाल कांद्यांना दोन हजार रुपये क्विंटलचा दर मिळणे अपेक्षित होते. मात्र लाल कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. लाल कांदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.


महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन 


देशात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. येथूनच इतर राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहेत. कांद्याला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. कांद्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी सौदेबाजी करत आहेत. असे असतानाही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.


नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन


नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ (Onion Market) आहे. या जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी कांद्याची लागवड करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून कांद्याच्या भावात सातत्याने कमी अधिक फरकाने घसरण होत असताना शेतकरी मात्र अजूनही कांदा शेतीवर निर्भर आहे. असे असताना रात्रीचा दिवस करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत.