Nashik Anjneri Hanuman : नाशिकचं (Nashik) अंजनेरी म्हटलं हनुमानाचे जन्मस्थान (Hanuman Birthplace) समोर येते. मात्र काही महिन्यापूर्वी याच जन्मस्थानावरून चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते. उद्या हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आल्याने नाशिकसह अंजनेरी जन्मस्थळावर उत्साहाचे वातावरण आहे. हनुमान जन्मस्थानसह अंजनेरी गडाचीही विशेष महती आहे. नेमका अंजनेरीचा इतिहास काय? अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थानाचा वाद काय? हे पाहणे महत्वाचे आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात नाशिक-त्र्यंबक मार्गावर हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळख असलेले अंजनेरी (Anjneri) हे गाव आहे. त्याचबरोबर अंजनेरी किल्ला देखील सर्वदूर परिचित आहे तो हनुमान-जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे सांगितले जाते. म्हणूनच या किल्ल्यासह गावाला 'अंजनेरी' नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे सांगितले जाते. शिवाय या डोंगरावर हनुमानाप्रमाणे अंजनीमातेचंही मंदिर आहे. त्याचबरोबर नाशिकच्या पंचवटी परिसरात राम सीता वनवासाच्या वेळी वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हनुमानाचा जन्म हा अंजनेरीचाच असल्याचे गावकरी सांगतात. 


नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर उजव्या हाताला अंजनेरी हे गाव लागते. अंजनेरी गावात जाण्याआधीच हनुमानाचे भव्य मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हनुमानाची जवळपास 11 फुटांची भव्य मूर्ती असून आजूबाजूचा परिसरही सुखावणारा आहे. तसेच मंदिराच्या मागील बाजूसच भव्य असा अंजनेरी गड सावली म्हणून उभा असल्याचा भास होतो. अंजनेरी गडाच्या पायथ्याला सुबक कलाकृती असलेली जुनी प्राचीन मंदिरे आहेत. जवळपास ती 16 मंदिरे असून त्यातली 12 जैन मंदिरे आहेत. मंदिरे बघून आपल्याला अंदाज येतो की, गड आणि त्याच्या आसपासचा परिसर किती प्राचीन आहे. 


अंजनेरीचा इतिहास काय? 


अंजनेरी हे तस सध्याच्या घडीला हजार दोन हजार लोकवस्तीचं गाव. परिसरात आजही अनेक प्राचीन काळातील मंदिरे असून हेमाडपंथी मंदिरे देखील पाहायला मिळतात. याच परिसरात जैन तीर्थंकराचे मंदिर, मठ व धर्मशाळा आजही उभ्या आहेत. एका जैन देवालयात 1142 चा संस्कृत शिलालेख असून त्यात यादव राजपुत्र सेउणचंद्र याचा उल्लेख आहे. ब्राह्मणी वास्तुकलेचे नमुनेही येथे भरपूर असून गणपतीची मूर्ती व शिवलिंग आढळते. मुस्लीम सत्तांच्या काळातही अंजनेरीचे उल्लेख येतात. शिवकाळात मोरोपंत पिंगळे यांनी इसवीसन 1670 मध्ये त्रिंबकगडाबरोबर अंजनेरीही जिंकल्याचा इतिहास आहे. राघोबादादा उन्हाळ्यात येथे राहत असत. त्यावेळी त्यांच्यासाठी बांधलेले ध्यानमंदीर, तलाव आणि फैलखाना येथे असून इंग्रजांनीही हे हवा खाण्याचे ठिकाण बनविले होते. 


हनुमान जनस्थळाचा वाद 


काही महिन्यापूर्वी अंजनेरी हनुमान जन्मस्थळावरून चांगलाच वाद रंगला होता. कर्नाटक राज्यातील किष्किंधा येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा एका महंतांनी केला होता. त्यानंतर हरियाणामधील कनखल, गुजरातमधील डांग, हरिद्वारमधील शेषाद्री पर्वत, तिरुपती येथील अंजनाद्री पर्वत अशा अनेक ठिकाणी हनुमान जन्माचा दावा केला जातो. याबाबत वेद पुराण, ब्रम्ह पुराण,ब्रम्हांड पुराण,शिव पुराण,रामायण आणि गोदा माहात्म्य,नवनाथ सार अशा ग्रंथांचे दाखले पाहणे आवश्यक आहे. या दाखल्याच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचं अंजनेरी पर्वत हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे धर्म पंडितांकडून सांगितले जाते.