Nashik Saptshrungi Gad: सध्या सप्तशृंगी गडावर Saptshrungi Gad) चैत्रोत्सव सुरु असून लाखो भाविक दर्शनासाठी गडावर येत आहेत. अशातच एक दुर्दैवी घटना घडली आहे. आईच्या दर्शनासाठी निघालेल्या दोन भाविकांवर काळाने घाला घातला आहे. गडावर पायी प्रवास करत येत असलेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते सप्तश्रुंगीच्या दर्शनासाठी (Saptshrungi Devi) गडावर निघालेले होते. मात्र वाटेत अघटित घडलं. 


सप्तशृंगी गडावर यात्रेसाठी (Saptshrungi Gad Yatra) पायी जाणाऱ्या दोन भाविकांचा मागील दोन दिवसांत मृत्यू झाला. मालेगाव (Malegaon) तालुक्यातील द्याने येथील भाविकाचा रात्री कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. तर जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) पाचोरा तालुक्यातील नांद्रे येथील एका भाविकाचा रस्त्याच्या कडेला शेतात मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. सटाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. 


दरम्यान मालेगाव तालुक्यातील द्याने येथील सोमनाथ देवराम पबार हे मालेगाव- सटाणा रस्त्यावरील यशवंतनगर परिसरात रात्री विश्रांतीसाठी जागेचा शोध घेत होते. त्यावेळी धांद्री शिवारातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिस पाटील श्रीधर बागुल यांनी सटाणा पोलिसात घटनेची माहिती कळवली. प्रभारी पोलिस अधिकारी किरण पाटील, पोलिस अतुल आहेर, जिभाऊ पवार, योगेंद्र शिसोदे यांनी सोमनाथ पवार यांचा मृतदेह परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला सोबत बॅग असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. 


तर दुसऱ्या घटनेत शेंबळी गावाजवळ पाचोरा तालुक्यातील नांद्रे येथील संभाजी भिवसन पाटील या यात्रेकरूचा रस्त्याच्या कडेला शेतात मृतदेह आढळला होता. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता, त्यांचा घात की अपघात याचा तपास सुरू आहे. सप्तशृंगी गडावर खानदेश परिसरातून रोज शेकडो भाविक दर्शनासाठी प्रवास करीत आहेत. दर्शनासाठी लवकर पोहोचले पाहिजे, यासाठी काही भाविकांकडून मधल्या व नजीकच्या वाटेचा अवलंब केला जात आहे. सप्तशृंगी गडाकडे भाविकांनी प्रवास करताना मुख्य रस्त्यानेच प्रवास करावा अंधार पडल्यावर ग्रामपंचायत व मंदिराच्या परिसर थांबा घ्यावा, असे आवाहन सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.


गडावर लाखो भाविकांची मांदियाळी 


सप्तशृंगी देवी मंदिरातील चैत्री नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. सप्तशृंगी मंदिरातील नवरात्रोत्सवाला रामनवमीपासून प्रारंभ होतो. साडेतीन शक्तिपीठांमध्ये अंतर्भाव असलेल्या आणि म्हणूनच सर्वज्ञात असलेल्या आणि खान्देशवासीयांचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हजारो नागरिक मोठ्या श्रध्देने येतात. हजारो खान्देशवासी भाविक रामनवमीचा उत्सव घरी साजरा करून दुस-या दिवशी पदयात्रेला प्रारंभ करतात.