Nashik Long March : अखेर पाच दिवसांच्या अथक आंदोलनानंतर शेतकरी लॉन्ग मार्च (Long March) माघारी फिरणार आहे. माजी आमदार जेपी गावित, जिल्हा प्रमुख, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाला यश आले असून सरकारने मागण्या मान्य केल्याने लाल वादळ शमले आहे. आता एका ट्रेनच्या माध्यमातून हे सर्व शेतकरी घरी परतणार असल्याचे समजते आहे.
आज माजी आमदार जे पी गावित (JP gavit) आणि संबंधित अधिकारी यांच्याशी बैठक पार पडली. या बैठकीनंतर जेपी गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गावित म्हणाले की, "राज्य सरकारने (State Government) आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या असून आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत." जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही लॉन्ग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
आमच्या 70 टक्के मागण्या मान्य : जे पी गावित
आज सकाळपासून आंदोलन (Farmers Protest) स्थगित होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनावर ठाम राहू असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. मात्र बैठकीच्या झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याची प्रत जेपी गावित यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नेमकं काय घडलं? ते स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार जीवा पांडू गावित म्हणाले की, "आम्ही सतरा मागण्या केल्या होत्या, यापैकी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. तर काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत."
शेतकऱ्यांना घरी पोहोचवण्यासाठी सरकारतर्फे ट्रेन बुक
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निवेदन आम्हाला दिले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलकांना विश्वासात घेतलं. त्यानुसार आता आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांनी सांगितलं. दरम्यान सरकारतर्फे शेतकऱ्यांना घरी पोहोचवण्यासाठी एक ट्रेन देखील बुक करण्यात आली आहे. अखेर पाच दिवस आपल्या मागण्यांसाठी हे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. दोन दिवस वाशिंद मध्ये मुक्कामांनंतर आज ते घरी परतणार आहेत.