Kisan Sabha Long March : किसान सभेच्या लाँग मार्च (Kisan Sabha Long March) बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री दादा भुसे, अतुल सावे आणि अखिल भारतीय किसान सभेच्या (All India Kisan Sabha) नेत्यांमध्ये मागील दोन तासांपासून सुरू असलेली बैठक संपली आहे. उद्या दुपारी 3 वाजता शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. विधिमंडळात मागण्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत किसान सभेचा लाँग मार्च (Farmers Long March) हा सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागील तीन दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून लाँग मार्च काढला आहे. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांनी लाँग मार्च निघाला तेव्हा किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. मात्र, त्यावेळी मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने लाँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केली. मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द झाली. त्यानंतर आज हा मोर्चा ठाणे जिल्ह्यात दाखल झाला. शहापूरमधील कलंब गावात लाँग मार्च दाखल झाला आहे. आज राज्य सरकारने आपले प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांना चर्चा करण्यासाठी पाठवले.
किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत मंत्र्यांनी जवळपास दोन तास चर्चा केली. बैठक संपल्यानंतर माकपचे नेते आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती पत्रकारांना दिली. गुरुवारी, दुपारी 3 वाजता मंत्र्यांनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ही बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. चर्चेच्या दरम्यान मागण्यांशी संबंधित मंत्र्यांनीदेखील उपस्थित राहावे अशी अपेक्षा किसान सभेने व्यक्त केली आहे. आजच्या चर्चेत जवळपास 40 टक्के उत्तरे मिळाली आहेत. तर, उर्वरित मुद्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सरकारसोबत चर्चा सुरू असताना किसान सभेचा लाँग मार्च हा सुरूच राहणार असल्याची माहिती गावित यांनी दिली.
पाच वर्षानंतर नाशिक ते मुंबई लाँग मार्च
पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी नाशिकमधून लाँग मार्च काढला होता. विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी महिला भगिनी पायपीट करत नाशिकहून मुंबईला पोहोचले होते. कुणाचे पाय रक्तबंबाळ झाले होते तर कुणाचे पाय सुजलेले होते. एवढं करुन काहीही उपयोग झाला का? असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण पुन्हा त्याच मागण्यांसाठी हे सर्व शेतकरी मजूर आणि आदिवासीबांधव पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावरुन उन्हाचा चटका सहन करत मुंबईला निघाले आहेत.