Nashik News : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज (18 मार्च) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील उपस्थिती दर्शवणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बसवण्यात आला असून या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पडणार आहे. तब्बल दोन एकर परिसरात साडे सात कोटी रुपयांचा निधी खर्च करुन ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या परिसरास गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. परळीहून भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) हे कार्यक्रमाला नसणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी फडणवीसांना निमंत्रण का दिले नाही? फडणवीसांनी कार्यक्रमाला येणे टाळले का? असे प्रश्न राजकीय नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. 


नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे हा लोकार्पण सोहळा होत असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसून येणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसणार आहेत. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रणच नाही का? अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


आयोजक उदय सांगळे म्हणाले.. 


यावर आयोजक उदय सांगळे म्हणाले कि, परळी येथील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला तीन जून असेल 12 डिसेंबर असेल देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतात. आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नाहीत, कारण त्यांना इतर ठिकाणी कार्यक्रम असल्याने ते येऊ शकणार नाही, त्यामुळे असं काही नाही कि त्यांना निमंत्रण दिले नाही. केंद्रीय मंत्री भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी या कार्यक्रमाला येत आहेत. त्यामुळे गडकरी येत आहेत म्हणजे सर्वच भारतीय जनता पार्टीचे पक्षाच्या नेत्यांच्या भावना हे आपण समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. मात्र सर्व दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस का नाही? हा प्रश्न उपस्थित झाल्याचे अनेकांनी सांगितले. 


असे आहे गोपीनाथ गड स्मारक!


सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकरांच्या तळ्यात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनास चार वर्षे पूर्ण झाली असून, या तळ्यात साठवणीचे पाणी होते. त्यालाच आकर्षक रुप देण्यात आले आहे. या कामासाठी दोन एकरच्या परिसरामध्ये 400 मोटरचा जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा 16 फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील विजय बोनदर यांनी तयार केला आहे.