Nashik Long March : शेतकरी लॉन्ग मार्चला (Long March) गालबोट लागले असून एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू (Farmers Death) झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील पुंडलिक दादा जाधव (Pundlik dada Jadhav) या शेतकऱ्यास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले. 


शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्च दरम्यान दुर्दैवी घटना घडली असून यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी (Dindori) तालुक्यातील मोहाडी येथील शेतकरी पुंडलिक जाधव यांचा वाशिंदमध्ये (Vashind) मृत्यू झाला आहे. काल (17 मार्च) त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मोर्चेकऱ्यांनी त्यांना तातडीने शहापूर ग्रामीण रुग्णालयात (Shahapur Rural Hospital) दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः या घटनेची माहिती दिली. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (CMO fund) पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती दादा भुसे यांच्यावतीने दिली आहे. 


विधानभवनातील शिष्टमंडळ आज मोर्चेकऱ्यांची भेट घेणार


शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च मुंबईच्या दिशेने पुढे सरकतो आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा लॉन्ग मार्च माघारी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु मुक्काम हलवायचा का नाही याचा निर्णय शेतकऱ्यांची चर्चा करुन आज घेतला जाईल अशी माहिती माजी आमदार जे पी गावित यांनी दिली आहे. जोपर्यंत निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मोर्चातून माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे आज विधानभवनातील शिष्टमंडळ आज मोर्चेकऱ्यांची भेट घेणार असल्याने यातून काय निर्णय होतो, हे महत्त्वाचं ठरणार आहे. 


'...तोपर्यंत आम्ही गावाकडे जाणार नाही'


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आश्वासन दिले असून पटलावर सगळ्या मागण्या आलेल्या असून मागण्या मान्य झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र या सर्व मागण्यांची अंमलबजावणी सुरु होणं आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जोपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे जाणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. कारण 2018 ला देखील लॉन्ग मार्च काढण्यात आला. त्यावेळी देखील आम्हाला तोंडी आश्वासन दिले, मात्र अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत हा लॉन्ग मार्च पुढे जात राहिल, असे स्पष्टपणे शेतकऱ्यांनी सांगितले. 


जोपर्यंत शासनाचा जीआर निघत नाही.... 


जोपर्यंत शासनाचा जीआर निघत नाही, तोपर्यंत इथून पाय काढणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आजही अनेक भागात लाईट नाही, पाणी नाही, अनेकांना घरकुल नाही, असे अनेक प्रश्न असून यावर काम केले पाहिजे. अनेक शासकीय योजना गावापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आमचा निर्धार आहे की, जोपर्यत शासनाचा अधिकृत जीआर निघत नाही, तोपर्यत आम्ही माघार घेणार नसल्याचे शेतकरी म्हणाले.